मुंबई – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या सोहळ्याची जय्यत तयारी संपूर्ण देशभर सुरू असून, यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनरसुद्धा अयोध्येत झळकले आहेत. या बॅनरवर लिहिलेला बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण झाल्याचा मथळा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
सकल हिंदु जणांचे आराध्य दैवत असलेल्या राम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. या मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत.
हे बॅनर महाराष्ट्रातील भाविकांसह सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरील हिंदी भाषेतील मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा दिवसाची संपूर्ण तयारी जोरात सुरू आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर अयोध्येत झळकले असून, लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘हिंदूहृदयसम्राट बालासाहेब ठाकरे जी की कामना हुई पुरी, शानसे विराजमान हुए है प्रभू श्रीराम आयोध्या नगरी’ असे लिहिले आहे. अर्थात ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छापूर्ती, अयोध्या नगरीत विराजमान झाली रामलल्लांची मूर्ती’ या स्वरुपाचा मजकूर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.