Eknath Shinde : ….तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील; ‘या’ नेत्याने सांगितली आतली बातमी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार (Eknath Shinde) चर्चा सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर‘ची जोरदार (Eknath Shinde) चर्चा सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. हे सर्व बंडखोर खासदार आधी स्वतंत्र गट स्थापन करणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे गटासाठी गेल्या चार वर्षांतील हा सर्वांत मोठा धक्का मानला जात असतानाच, या घडामोडींमुळे शिंदे गटाची (Eknath Shinde) बार्गेनिंग पॉवर कमालीची वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडकर यांनी एक खळबळजनक दावा केला असून, भविष्यात एकनाथ शिंदे हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस देशाचं नेतृत्व करणार, शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद!
माध्यमांशी संवाद साधताना आमदार नरेंद्र भोंडकर यांनी आगामी काळातील सत्तासमीकरणांवर मोठे भाष्य केले. ते म्हणाले “ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद प्रचंड वाढणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सक्षमपणे राज्य चालवत आहेत, परंतु भविष्यात ते दिल्लीत जाऊन देशाचे नेतृत्व करतील. तर देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.”
“आमचे ऑपरेशन ३६५ दिवस सुरूच असते”
ठाकरे गटातील या मोठ्या फुटीवर बोलताना भोंडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधला. “मुळात उद्धव ठाकरे यांना स्वतःचे आमदार आणि खासदार सांभाळता येत नाहीत. आमचे राजकीय ऑपरेशन हे वर्षाचे ३६५ दिवस सुरूच असते. आता नक्की किती खासदार आमच्याकडे येत आहेत, याचा आकडा मी आत्ताच सांगणार नाही पण ‘एक’ अपवाद वगळता सर्वच खासदार आमच्या वाटेवर आहेत,” असे सूचक विधान त्यांनी केले.
वर्धापन दिनाला अजून दोन दिवस शिल्लक; मोठा धमाका होणार?
वर्ष २०२२ मध्ये झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीची आठवण करून देत भोंडकर म्हणाले की, जे २०२२ मध्ये झाले होते, त्याचीच पुनरावृत्ती आज होताना दिसत आहे. “आम्ही कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ जाणीवपूर्वक तयार केलेले नाही. ठाकरे गटातील नेत्यांना तिथे सन्मान आणि समाधान मिळत नसल्यानेच ते स्वतःहून इकडे येत आहेत.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाला अजून दोन दिवस शिल्लक आहेत, तोपर्यंत बरेच काही स्पष्ट होईल,” असा सूचक इशारा त्यांनी दिला. तसेच, उद्धव ठाकरेंना वेळ मिळत नसेल, तर त्यांच्या खालच्या फळीतील नेत्यांनी तरी खासदारांना सांभाळायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
भविष्यात संजय राऊतही आमच्याकडे येतील!”
ठाकरे गटाच्या खासदारांना फुटण्यासाठी १५ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम (ॲडव्हान्स) मिळाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. भोंडकर यांनी हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला. “१५ कोटींच्या आरोपात काहीही तथ्य नाही. राऊत केवळ वैफल्यातून हे आरोप करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, भविष्यात संजय राऊत स्वतः देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आलेले दिसतील,” असा टोमणा त्यांनी राऊतांना लगावला.
ठाकरेंची ‘सेकंड टीम’ अपयशी
संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या इतर प्रमुख नेत्यांनी पक्षांतर्गत समन्वय ठेवायला हवा होता, असे सांगत भोंडकर म्हणाले की, ठाकरेंकडची ‘सेकंड टीम’ (दुसऱ्या फळीतील नेतृत्व) पूर्णपणे अपयशी ठरली आहे. ठाकरे गटातून (Eknath Shinde) नेमके किती लोक बाहेर पडत आहेत, हे सध्या केवळ एकनाथ शिंदे यांनाच ठाऊक आहे पण या घडामोडींमुळे आमचा पक्ष अधिक मजबूत होईल आणि शिंदेंची ताकद वाढेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.






