Eknath Shinde : नारा महायुतीचा पण चाचपणी स्वबळाची ; एकनाथ शिंदे यांचा भर संघटनात्मक बांधणी करण्यावर

प्रभात वृत्तसेवा
सातारा – महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा दणक्यात पार पडला. कार्यकर्ता जपण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी करत कपटी विरोधक व महाकन्फ्युज अशी शेलकी टीका करत उद्धव सेनेसह महाविकास आघाडीला डिवचले. शिंदे यांनी महायुतीचा नारा दिला तरी संघटनात्मक बांधणीसाठी स्वबळाची चाचणी होणार असल्याचे दिसून आले.शिवसेनेचा वटवृक्ष कधी होणार आणि एकापेक्षा जास्त नगरसेविका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी निवडून येणार असा एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सवाल विचारला.
अवघ्या पाचच मिनिटात शिंदे यांनी शिवसेनेला यापुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वबळावर जावे लागेल महायुतीत असूनही आपल्याला आपली संघटनात्मक ताकद बांधावी लागेल असे अप्रत्यक्ष निर्देश दिले. तसेच महायुतीमध्ये शिवसैनिकाला सन्मानाची वागणूक दिली जावी अशी अपेक्षा असल्याचे स्पष्ट सूतोवाच शंभूराज देसाई यांनी सुद्धा केले. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची जिल्ह्यातील बांधणी वेगवान आहे .
हे लक्षात आल्यावर शिंदे यांनी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील दौरे गतिमान करत साताऱ्यात मेळावा घेण्याचे निर्देशित केले होते. महायुतीमध्ये सगळं काही ऑलवेल नसल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रात संदेश जाण्यासाठी पहिला मेळावा साताऱ्यात घेण्यात आला. कारण एकनाथ शिंदे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून शिवसेनेची ताकद आजमावण्याच्या दृष्टीने आणि शिवसैनिकांना बळ देण्यासाठी हे क्रमप्राप्त आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांची बैठक काही दिवसांपूर्वी झाली.मुंबईला वारंवार भेटीसाठी न येता जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित करावे, असे स्पष्ट सूचना दिल्या. बोलावल्याशिवाय मुंबईत यायचे नाही अशा परखड कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटातही भाकरी फिरवली जाईल अशी चर्चा आहे. शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःच्या बळावर कुठे कुठे निवडून येण्याच्या गुणवत्तेचे उमेदवार द्यावे लागतील यासंदर्भात चाचपणी सुरू आहे.
रायगड, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली इत्यादी जिल्ह्यांमध्ये मित्र पक्षांकडूनच पाय खेचला जात असल्याच्या तक्रारीमुळे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या प्रतिक्रिया बोलून दाखवत आहे. जिल्ह्यामध्ये शिंदे गटाची मदार पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या खांद्यावर आहे. साताऱ्यात भाजपच्या खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन्ही आघाड्यांचा दबदबा आहे .
त्यामुळे येथे जुळवून घेताना स्वबळापेक्षा शिवसेनेची काही चेहरे आघाड्यांमधून महायुती धर्म म्हणून दिसतील की त्यासाठी स्वतंत्र योजना करावी लागेल याबाबत अद्याप खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणते निर्णय घेतात हे पाहवे लागेल. या सर्व हालचालींवर पक्षाध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.
शंभूराज देसाईंवरच जबाबदारी..
जिल्हा कार्यकारिणी व शहर कार्यकारणी यांच्यामध्ये राजकीय नाराजीनाट्य सातत्याने लिरि असते. त्यामुळे कनिष्ठ स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत की मनभेद, अशी शंका येते. संपर्कप्रमुख शरदराव कणसे यांचा ‘साताऱ्यात कमी तर ठाण्यात अधिक संपर्क असेच कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे.पालकमंत्री शंभूराज देसाई यांना संघटनात्मक बांधणीबरोबर शासकीय कॅबिनेट मंत्री प्रभागाचा प्रोटोकॉल सांभाळायचा आहे.
त्यामुळे त्यांच्यावर राज्य शासनाचा प्रतिनिधी आणि पक्षाचा जबाबदार नेता म्हणून दुहेरी जबाबदारी आहे. जिल्ह्यात शिवसेना एकमुखी दिसण्यासाठी शंभूराज देसाई यांना मोठी जबाबदारी उचलावी लागेल. कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार महेश शिंदे यांनी सुद्धा जे पोटात तेच ओठात असे सांगत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.





