Eknath Shinde : रायगडमध्ये एकनाथ शिंदेंना धक्का! सुनील तटकरे यांनी लावला मोठा सुरुंग

रायगड : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा वाद तटकरे आणि गोगावले या दोघांमध्ये सुरु असतानाच रायगड जिल्ह्यात मोठ्या कुरघोडी होताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते कोणतीही संधी सोडत नाहीत. त्यातच आता मंत्री भरत गोगावले यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या माणगाव नगरपंचायतीला सुनील तटकरे यांनी मोठा सुरुंग लावल्याचं पाहायला मिळत आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे हे माणगाव नगरपंचायतीच्या माजी नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटाची साथ सोडणार असून येत्या 2 ऑगस्ट रोजी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी देखील शिंदे सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी आम्ही आमच्या नेत्यासोबत राहणार असल्याचे माणगाव नगरपंचायतमधील नगरसेवकांनी सांगितले आहे. त्यामुळे रायगडमध्ये आता मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





