Maharashtra Politics : राज्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. पक्षात लवकरच मोठा उलटफेर होणार असून निष्क्रीय पदाधिकाऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics) पक्षश्रेष्ठींकडून मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे ‘प्रगती पुस्तक’ पुढील 15 दिवसांत तयार केले जाणार असून कामगिरीनुसारच पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “शिंदे साहेब कायम अॅक्टिव मोडमध्ये असतात. आता संपर्कप्रमुखांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. जे काम करत नाहीत, केवळ पद भूषवतात, त्यांना बाजूला करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.” (Maharashtra Politics) तळागाळापर्यंत पोहोचण्याचे आदेश पक्षवाढीला गती देण्यासाठी शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करण्यासह बूथस्तरावर संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. मतदार याद्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले असून, “काम दिसले नाही तर पद राहणार नाही,” अशी स्पष्ट तंबीही शिंदेंनी दिली आहे. (Maharashtra Politics) महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा 11 तारखेपासून राज्यभर दौरा काढून पदाधिकाऱ्यांच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. अलीकडेच संपर्कप्रमुख आणि विभागीय संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या ऑनलाईन बैठकीत शिंदे यांनी मंत्री, आमदार आणि खासदारांना ‘पद विसरून कार्यकर्ता म्हणून काम करा’ असा स्पष्ट संदेश दिला. या सर्व घडामोडींमुळे शिंदेसेनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता असून, अनेक पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)