मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय हालचालींना वेग दिला असून, ऐन निवडणुकीत त्यांनी मोठा डाव टाकला आहे. मुंबईत शिवसेना-भाजप युती असली तरी नवी मुंबईत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत शिंदेंसमोर थेट भाजपचे तगडे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असतानाच एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट, मनसे, भाजप तसेच काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देत मोठा धक्का दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबई आणि मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरुळ विभागातील ठाकरे गट, मनसे आणि भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. तसेच धारावीतील काँग्रेस आणि मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोणाचा शिंदे गटात प्रवेश? नवी मुंबईतील भाजप उपाध्यक्ष राजू तिकोने, नेरुळचे महामंत्री शशिकांत मोरे, वॉर्ड अध्यक्ष भरत म्हात्रे, नेरुळ भाजप उपाध्यक्ष सोनपा घोलप, ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख प्रतापसिंह विसाळ, माजी विभागप्रमुख सुनील हुंडारे, मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नायकडे, युवा सचिव ऋषिकेश भुजबळ, तालुका सचिव अक्षय शिरगावकर, वॉर्ड अध्यक्ष सुजित भोर, सागर जोगाडिया, आशिष कदम, गुरुदास गर्जे, अमित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सुरेश मोगला, जयेश मुदलीयार, मुंबई युवक काँग्रेसचे महासचिव विकी व्हटकर, धारावी विधानसभा उपमुख्य समन्वयक विनायक पोळ, रोशन शेख, महेश तावरे, धारावी काँग्रेसचे दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शिवलिंग व्हटकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेच्या विभाग सचिव सविता बोबडे, दीपक नारायणे, राजेश कुमार पारयार, धनाशेखर पारयार, सुरेश बेडगिरी यांचाही यामध्ये समावेश आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक नामदेव भगत, काशीनाथ पवार तसेच धारावी आणि नवी मुंबईतील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडींमुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.