प्रभात वृत्तसेवा आळंदी – महायुतीमध्ये दंगा करायचा नाही आणि विरोधकांच्या हातात काही कोलीत मिळेल असं करू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील वादावर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे यांनी आळंदी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले, मी त्यांना सांगितलं आहे की महायुतीत दंगा होऊ नये. रवींद्र धंगेकर यांना महायुतीत काम करणारा व अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता असल्याचे सांगत शिंदेंनी पाठदेखील थोपटली. धंगेकर यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे की, भाजप विरोधात आपली भूमिका नाही. आता जे काही प्रकरण सुरू आहे त्यावरही पडदा पडेल. या प्रसंगी धंगेकर स्वतः शिंदे यांच्या सोबत उपस्थित होते आणि हेलिपॅडवर शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उदय सामंतांचे संयमाचे आवाहन.. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही मोहोळ-धंगेकर वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांना काही गैरसमज झाला आहे. दोन्ही बाजूंनी महायुतीत मिठाचा खडा पडेल असे वागू नये. प्रत्येकाने संयम ठेवावा. रवींद्र धंगेकर बोलत असताना योग्य आहे असे मी कधीच म्हटलं नाही.