Eknath Shinde : अमित शाहांना भेटल्यानंतर दिल्लीतून एकनाथ शिंदेनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असे जाहीर केले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी बुधवारी, 6 ऑगस्ट 2025 रोजी, शिवसेनेच्या खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना-भाजपा युतीच्या 25 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख केला आणि एनडीएतील शिवसेनेची विश्वासार्ह मित्र म्हणून असलेली भूमिका अधोरेखित केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत शिंदे यांनी मोठी घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते स्वबळावर निवडणुका लढण्याचे संकेत देत असताना, शिंदे यांनी स्पष्ट केले की, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढल्या जातील. “महायुतीच्या एकजुटीने विधानसभेत यश मिळाले, त्याचप्रमाणे स्थानिक निवडणुकांमध्येही एकत्र लढू,” असे त्यांनी सांगितले.
माधुरी हत्तीण प्रकरणी फेरविचार याचिका
माधुरी हत्तीण प्रकरणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. यात राज्य सरकार आणि वनतारा पक्षकार असतील. जनभावनांचा आदर करत सरकार या प्रकरणी योग्य पावले उचलेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांशी भेटण्यासाठी आलो असून, “आम्ही लपूनछपून काही करत नाही,” असा टोला त्यांनी शिवसेना (उबाठा) गटाला लगावला.
अमित शाह यांना शुभेच्छा
शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना सलग 2,258 दिवस गृहमंत्रीपदाची सेवा पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. “कलम 370 रद्द करून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणे, ऑपरेशन महादेवद्वारे दहशतवाद्यांचा खात्मा करणे आणि नक्षलवादाचा बीमोड करणे, यासह देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणारे सक्षम गृहमंत्री म्हणून अमित शाह यांचा गौरव आहे,” असे शिंदे म्हणाले.
शिवसेना-भाजपा युतीचा 25 वर्षांचा प्रवास
शिंदे यांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. “एनडीएच्या स्थापनेपूर्वीपासून शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत. शिवसेना एनडीएतील सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र आहे,” असे त्यांनी सांगितले. या भेटीत उपराष्ट्रपती निवडणुकीसह युतीच्या भविष्यातील रणनीतीवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.





