Eknath Shinde : मराठ्यांना मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्र; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार

मुंबई : त्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती, आम्ही आधी दिलेले आरक्षण कोणामुळे गेले याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलेले आरक्षण ते सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत, असे त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना त्यांनी विचारायला हवे होते. तसेच, मी जे काही बोलतोय ते काही लोकांना माहित पडावे यासाठीच बोलतोय.
आम्ही जे 10 टक्के आरक्षण दिले ते टिकले आहे. तर, शिंदे कमिटी गठीत करुन अनेक पुरावे शोधून कुणबी नोंदीही शोधल्या आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली आणि याचा लाभ मराठा समाज घेतो, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारा असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार हे खूप सीनियर लीडर आहेत, ते परिपक्व नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्रिपद भोगलं आहे. केंद्रामध्ये सुद्धा केंद्रीयमंत्री म्हणून काम केलेले आहे. मग असं असताना इतक्या वर्षात त्यांनी हा विचार का केला नाही, असा प्रश्न शिंदेंनी शरद पवारांना केला आहे. तसेच त्यांनी हा विचार करुन तो निर्णय यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. यापूर्वी देखील काँग्रेसचे सरकार होते हे आपल्याला माहित आहे.
राज्यात आणि केंद्रात सुद्धा ते होते. मग तेव्हाच हा निर्णय का घेतला नाही. आम्ही जे आरक्षण दिलेले आहे, त्याच्यावर आरोप करणे आणि टीका करणे किंवा कोणाच्या तरी कोर्टात चेंडू टाकने हे योग्य नाही. त्यांच्याकडे सुद्धा इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव आहे. मराठा समाज आणि इतर कोणत्याही समाजाच्या बाबतीत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी मिळून निर्णय घ्यायला हवा. मात्र, इकडे वेगळी भूमिका आणि तिकडे वेगळी भूमिका असे कोणीही करता कामा नये, असा पलटवार त्यांनी केला.





