Eknath Shinde : साताऱ्यात बालकांसाठी हृदय शस्त्रक्रिया शिबिर; चिमुकल्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी भेट
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे मोफत हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

Eknath Shinde – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील लहान मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयात दि. १ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना मेडिकल हेल्प सेल यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जात असून, आतापर्यंत १० हजारांहून अधिक बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यंदाचे हे शिबिर विशेषतः हृदयविकार असलेल्या बालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमांतर्गत लहान मुलांची मोफत टू डी इको (हृदय तपासणी) केली जाणार आहे.
तपासणीत शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची पुढील शस्त्रक्रिया ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर डॉ. आशुतोष सिंह आणि डॉ. पूजा सिन्हा उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभत आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रामहरी राऊत, नीलेश मोरे, प्रवीण पाटील, धीरज गांधी, अनिल मोरे, दीपक चव्हाण, अक्षय बामणे, सोमनाथ भंडारी, रणजित साबळे, किरण सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.
गरजू पालकांनी आपल्या बालकांची तपासणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने सचिव गणपती राम कांबळे, जिल्हा कक्ष प्रमुख रितेश ननावरे, उपजिल्हाप्रमुख शिवराज चव्हाण यांनी केले आहे.





