Eknath Shinde : इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या (जानेवारी २०२६) प्रचाराला जोर चढत असताना आज (१२ जानेवारी २०२६) शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची (भाजप-शिवसेना शिंदे गट) जाहीर सभा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
सभा सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथम बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत सभेला संबोधित केले. ते म्हणाले, “शिवसेना आणि शिवतीर्थ यांचे अतुट नाते आहे. आजूबाजूला असलेल्या तिन्ही महापुरुषांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीने ही सभा होत आहे. ही प्रचारसभा नाही, तर परिवर्तनाची सभा आहे.”
“कालच्या सभेला उत्तर देणार नाही, फक्त विकास सांगणार”
शिंदे यांनी काल (११ जानेवारी) ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) संयुक्त सभेचा थेट उल्लेख करताना सांगितले, “काल इथे सभा झाली, त्यात टीका-टोमणे झाले. आम्ही त्यांना उत्तर देणार नाही. आम्ही फक्त कामाचा लेखाजोखा मांडणार आणि पुढील पाच वर्षांत काय करणार हे सांगणार. आमचा अजेंडा फक्त विकास आणि विकास आहे.”
राज ठाकरेंना नाव न घेता जोरदार टोला
एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “काही लोकांना फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस दिसतो. इतर वेळी नेटफ्लिक्स पाहणे आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स करणे हे कळते. त्यांच्याच काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला. पण मराठी माणसाचे अस्तित्व कधीच धोक्यात नव्हते, आजही नाही आणि उद्याही नाही.”
शिंदे पुढे म्हणाले, “मुंबईचे हित जपायला आम्ही समर्थ आहोत. एकनाथ शिंदे मराठी नाही का? देवेंद्र फडणवीस मराठी नाहीत का? २० वर्षांपूर्वी जेव्हा दोघं एकत्र यावेत ही बाळासाहेबांची इच्छा होती, तेव्हा एकत्र आला नाहीत. आता स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात.” मतदानाच्या तोंडावर ठाकरे बंधू आणि शिंदे-फडणवीस यांच्यातील हे शाब्दिक युद्ध मुंबईच्या मतदारांवर काय परिणाम करेल, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.





