Eknath Shinde : ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे आणि सुरक्षारक्षकांचा मोठा फौजफाटा होता.
एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
तब्बल तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घराच्या बाहेर पडले. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी आपण चेकअपसाठी आलो होतो, प्रकृती बरी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झालं आहे. त्यांच्या शऱीरात पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत. डॉक्टर त्यांचं सीटी स्कॅन करणार असल्याचे समजत आहे.
महायुतीत गृहकलह?
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप गृहखातं सोडायला तयार नाही आहे. तर शिवसेना गृहखात्यासाठी ठाम आहे. भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्ष गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
‘मुख्यमंत्रिपद भाजपकडे तर गृहमंत्रिपद आम्हाला पाहिजे असे सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे समजत आहे. आता तिढा सोडवण्यात महायुतीला यश येते का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





