Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; 105° ताप, कणकणी….,सलाईन लावले

सातारा – राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आले आहे. शिंदे यांना 105° ताप आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्याना कणकणी आली आहे. यामुळे ते दिवसभरापासून घराबाहेर पडलेले नाहीत. दरम्यान, डॉक्टरांची टीम मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी आली आहे. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी सध्या सलाईन लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या घरातच त्यांना सलाईन लावले जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तेच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले; त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून भाजपकडून डावलण्यात आले असून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरून बाजूला होऊन गृहमंत्रीपद मागितले मात्र ते देण्यास देखील भाजपने नकार दर्शवला आहे. केवळ उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपदे दिली जातील असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सायंकाळी ते आपला निर्णय जाहीर करतील असे देखील सांगण्यात येत आहे.





