Pune City | अवयवदान प्रक्रियांचे सुलभीकरण करण्याचा प्रयत्न – जे.पी. नड्डा

प्रभात वृत्तसेवा
नवी दिल्ली – भारत सरकार अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियांचे सातत्याने सुलभीकरण करत आहे, जेणेकरून अधिकाधिक नागरिकांना त्याचा फायदा घेता येईल. शहरांमध्ये अवयवांची वेळेवर आणि सुरळीत वाहतूक तसेच यशस्वी अवयव प्रत्यारोपण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता सुधारण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खतमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केले.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेने १५ व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला नड्डा उपस्थित होते. अवयवदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जीवनाची देणगी देणाऱ्या निःस्वार्थ दात्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.अवयवदान हे मानवतेच्या सर्वात उदात्त कार्यांपैकी एक आहे. ज्या जगात वैद्यकीय विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगती केली आहे, त्या जगात अवयवदान हे दुसऱ्या व्यक्तीसाठी दिले जाणारे सर्वात मोठे योगदान आहे.
अवयव निकामी होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून आरोग्यसेवेवरील ताण वाढत चालला आहे.दरवर्षी हजारो लोक अवयव प्रत्यारोपणाची वाट पाहत असतात. तातडीची गरज असूनही प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या आणि उपलब्ध दात्यांची संख्या यात लक्षणीय तफावत आढळून येते. ही तफावत इच्छेच्या अभावामुळे नाही, तर अनेकदा जागरूकतेचा अभाव आणि गैरसमजांमुळे निर्माण होणाऱ्या संकोचामुळे आहे.
आपल्याला जागरूकता निर्माण करण्यासाठी, संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दात्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी एक व्यासपीठ देणारा आजचा दिवस महत्त्वाचा आहे असे नड्डा म्हणाले.अवयवांची गरज आणि उपलब्ध दात्यांमधील तफावत या पार्श्वभूमीवर अधिक व्यापक जागरूकता, अधिक व्यापक सार्वजनिक संवाद, कुटुंबांकडून वेळेत संमती मिळणे तसेच मृत व्यक्तींद्वारे दानाला पाठबळ देण्यासाठी मजबूत व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.





