पुणे | मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी प्रयत्न

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मायमराठीच्या जागरासाठी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषेचे अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे,
सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, माजी मंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या राजधानीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या आयोजनाला विद्येच्या माहेरघरातून सुरुवात होत आहे. मराठी संस्कृतीच्या राजधानीपासून सत्तेच्या राजधानीपर्यंत मायमराठीचा डंका वाजतो आहे. संमेलनाच्या तयारीची सुरुवात चांगली झाली असून, या संमेलनाला काही कमतरता भासणार नाही. जगातल्या १२ कोटी मराठी नागरिकांना जोडणारे हे संमेलन आहे.
परदेशातही मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान असणारा हा भाषेचा उत्सव ७० वर्षानंतर दिल्लीत होत आहे. दिल्लीसह उत्तर भारतात राहणाऱ्या मराठी भाषिकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी शासन संस्थेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.





