पुणे | मुलींना मोफत शिक्षणची अंमलबजावणी प्रभावीपणे करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुलींना मोफत शिक्षण मिळणार, याबद्दल अतिशय आनंद आहे. महाविद्यालयाने मुलींना मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे केली पाहिजे, असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.
खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात मुलींना मोफत शिक्षण या योजनेच्या अंमलबजावणीच्या शुभारंभप्रसंगी गोयल बोलत होते.
या वेळी संचालक रमेश अवस्थे, सुधीर फेंगसे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, शिष्यवृत्ती नोडल अधिकारी डॉ. सुचेता दळवी, शिष्यवृत्ती कक्षाचे सदस्य प्रा. जे. डी. नाईक, प्रा. अमृता खेंदाड, प्रा. आरती चोळेकर, प्रा. योगिता झोपे आदी उपस्थित होते.
शासनाने महाराष्ट्रात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णय घेतला.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात शिष्यवृत्ती कक्ष स्थापन करून डॉ. सुचेता दळवी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. महाविद्यालयाच्या दर्शनी भागात शिष्यवृत्तीची माहिती देणारा फलकही लावण्यात आला आहे.





