महामारीतील प्रभावी “बारामती मॉडेल’

23 मार्च 2020 मध्ये बारामतीमध्ये पहिला करोना रुग्ण आढळून आला. त्या दिवसापासून आजतागायत जवळपास 13 ते 14 महिने बारामतीची आरोग्य विभागाची संपूर्ण टीम लढा देत आहे. त्यामध्ये पहिल्या लाटेमध्ये सुरुवातीच्या काळात बारामतीमध्ये जवळपास एक महिना एकही रुग्ण आढळून आला नव्हता.
बारामती प्रशासकीय यंत्रणेने स्वयंसेवकांच्या मदतीने घरोघरी अत्यावश्यक सेवा देऊन वेगळा “बारामती पॅटर्न’ तयार केला होता. दिल्लीच्या केंद्रीय पथकाने या पॅटर्नची दखल घेतली. यात टीम वर्कचे योगदान वैद्यकीय क्षेत्रात “बारामती पॅटर्न’ म्हणून देशभरात नावारूपास आला. या पॅटर्नविषयी बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी साथीत प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या उपाययोजनांवर टाकलेला प्रकाशझोत…
बारामतीमध्ये संपूर्ण करोना काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब हे दर आठवड्याला करोना आढावा बैठक घेत असत. त्यामध्ये आरोग्य विभागाला काय हवं, काय आवश्यक आहे, कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, याची माहिती घेऊन लागलीच त्याबद्दल पुरवठा करीत होते.
त्यामुळे आम्हा सर्व टीमला काम करताना अत्यंत समाधान, ऊर्जा मिळत होती. कारण पहिल्या लाटेपेक्षासुद्धा दुसऱ्या लाटेमध्ये महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस दादांच्या कार्यतत्परतेमुळे तत्काळ आम्हाला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले. ऑक्सिजन बेड संख्या वाढवण्यात आली. अशा वेळेस कोणालाही इंजेक्शन, रेमडेसिविरची कमतरता भासत होती.
तीसुद्धा दादांच्या मदतीने बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आम्हाला यश आले, अशा वेळेस शासकीय आरोग्य यंत्रणेने करोना उपचारामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. करोना काळामध्ये दिवसरात्र कोणाला बेड उपलब्ध करून द्या, कोणाला इंजेक्शन उपलब्ध करून द्या, व्हेंटिलेटर बेड मिळवून द्या, गावागावांमध्ये, शहरांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांची तपासणी करून घेणे, पॉझिटिव्ह पेशंटला दवाखान्यामध्ये दाखल करणे आदी कामे करताना संपूर्ण आरोग्य यंत्रणेची दमछाक होत होती;
परंतु आमची संपूर्ण टीम त्यामध्ये कुठेही कमी पडली नाही. किंवा कंटाळली नाही, यासाठी आरोग्य विभागाबरोबरच ग्रामपंचायत, महसूल, शिक्षण विभाग या सर्वांनी बारामतीमध्ये उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब, मुख्याधिकारी साहेब, मी स्वतः, वैद्यकीय अधीक्षक काळेसर, दराडे सर या टीमने दिवसरात्र मेहनत करून जास्तीत जास्त सर्वच रुग्णांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
यामध्ये काही त्रुटी असतील; परंतु आमच्या परीने जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न केला. बारामतीतील रुग्णांना कमीत कमी त्रास कसा होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले. शासकीय आरोग्य यंत्रणा ठरवल्यानंतर किती मोठ्या प्रमाणावर काम करू शकते, ही समाजाला दाखवून दिले. आतापर्यंत शासकीय यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.
तो करोनाच्या निमित्ताने नक्कीच बदलला असेल, याचा मला विश्वास वाटतो. यापुढील काळात सुद्धा याच्यामुळे शासकीय यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून आरोग्य यंत्रणेचा चेहरा बदलेल आणि लोकांना जास्तीत जास्त आरोग्यसेवा मिळेल, असा विश्वास वाटतो. संपूर्ण कामांमध्ये आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिवसरात्र सर्वेक्षण करून रूग्णांची सेवा करून कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता, कुटुंबाची तमा न बाळगता अहोरात्र काम केले आहे.
त्याला खरोखरच तोड नाही. सर्व सहकाऱ्यांचे मी एक विभागप्रमुख म्हणून ऋण व्यक्त करतो. या कठीण काळात का होईना. पण समाजाची सेवा करण्याची थोडी तरी संधी मिळाली, याबद्दल परमेश्वराचे सुद्धा ऋण व्यक्त करतो. मी आशा व्यक्त करतो की, तिसरी लाट बारामतीमध्ये येणार नाही. त्यांच्यासाठीसुद्धा आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे.
त्यामध्ये लहान मुलांना त्याचा त्रास होईल, याचा विचार करून त्यासाठी स्वतंत्र लहान मुलांची व्यवस्था, लहान मुलांसाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था याची तयारी केलेली आहे. बालरोगतज्ज्ञ पथक तयार केलेले आहे. 6/29, 3:28 झच ऊी. चरपेक्ष घहोरपश: करोनाची लाट ओसरत असतानाच दुसरीकडे लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये राबवण्यात येत होती.
यामध्ये बारामती शहरांमध्ये चार ठिकाणी व ग्रामीण भागामध्ये उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून 31 ठिकाणी अशा पद्धतीने आपण लसीकरण केंद्रे सुरू करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लस कशी देता येईल, याचे काटेकोर नियोजन केले होते.
त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यश मिळून आजअखेर बारामतीमध्ये 131719 लोकांना लसीकरण केले आहे. अजूनही लसीकरण चालू आहे. लसपुरवठा व्यवस्थित झाल्यास दिवसरात्र लसीकरण करण्याचीसुद्धा आमच्या आरोग्य विभागाची तयारी आहे. बारामतीमध्ये कोणती गोष्ट घडली की त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतात, याची पुरेपूर काळजी आमच्या आरोग्य विभागासह इतर सर्वच शासकीय विभागांनी घेतली.
यामध्ये दादांबरोबरच सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले म्हणून हा लढा काहीअंशी यशस्वी झालेला आहे, तरी अजूनही करोनाचा धोका टळलेला नाही, यासाठी सर्वच बारामतीकर नागरिकांना मी आवाहन करेन की, आपण मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करावा. करोनापासून आपले व आपल्या कुटुंबीयांचे संरक्षण करावे तसेच उपचारांमध्येसुद्धा तीन टी (टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट) या त्रिसूत्रीचा वापर करावा.
शब्दांकन
प्रमोद ठोंबरे (तालुका प्रतिनिधी)





