सीमाभागात मराठी भाषिकांसाठी शैक्षणिक संकुल – उदय सामंत

कोल्हापूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या सीमाभागात शिवाजी विद्यापीठामार्फत मराठी भाषिक तरुण-तरुणींसाठी शैक्षणिक संकुल उभे करावे. या पद्धतीचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला होता. याला आता मूर्त रूप येणार आहे. सीमाभागात उभारल्या जाणाऱ्या या शैक्षणिक संकुलाचे काम तत्काळ सुरू करा, असे आदेश उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात झालेल्या बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीत दोन भागामध्ये शैक्षणिक संकुल उभं करावे यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठी चंदगड तालुक्यात शिनोळीसह एकूण तीन गावांची निवड करण्यात आली आहे. या तीन गावापैकी दोन ठिकाणी हे शैक्षणिक संकुल उभ राहणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, सीमाभागात उभारल्या जाणाऱ्या संकुलाचे काम तत्काळ सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. या शैक्षणिक संकुलात पारंपारिक शिक्षणाबरोबरच डेव्हलपमेंट अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात कोविड-19च मोठं संकट आहे.
या संकटात सर्व विद्यापीठ लढा देत आहेत. यात शिवाजी विद्यापीठदेखील अग्रेसर असून 6 हॉस्टेल कोविड सेंटर म्हणून वापरात आहेत. यामुळे यूजीसीने या गोष्टींची दखल घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत असून डिझास्टर मॅनेजमेंट सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात परीक्षा होणार नाही. हे आम्ही युजीसीला कळवणार आहोत. दरम्यान “कोविड-19 पास’ असा शिक्का लावून विद्यार्थी पास होणार असे विरोधक अपप्रचार करत आहेत. हे एक प्रकारे विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणे आहे, असे देखील ते म्हणाले.
फी वाढ नाही
राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरूनसुद्धा परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे ही फी परत द्यावी का? किंवा पुढच्या वर्षी तिच्या आधारे परीक्षा घेता येतील का? याचा देखील विचार राज्य सरकार करत आहे. तसेच राज्यात कोणत्याही परिस्थितीत फी वाढ होणार नाही. यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.





