शिक्षण विभागाच्या “रिकाम्या जागा भरा’

पुणे – राज्य शासनाच्या शालेय, उच्च व तंत्र शिक्षण विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल 6 हजार 983 पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा भार पडत असून कामाचा वेगही मंदावला आहे.
राज्यातील शालेय, उच्च व तंत्र शिक्षण हे दोन्ही विभाग महत्त्वाचे मानले जातात. शासनाकडून मागील काही वर्षांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात नोकरभरतीच झाली नाही. दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रिक्त पदांमध्ये निश्चितच आणखी वाढ होत जाणार आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत सुरेश गजलवार यांनी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबची माहिती मागविली होती.
शासनाकडून 31 डिसेंबर 2019 अखेरपर्यंची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. सरळसेवा बरोबरच पदोन्नतीद्वारेही पदे झाली नसल्याची बाब उघड झाली आहे. अधिकारी, कर्मचारी संघटनांनी रिक्त पदे भरण्याबाबत व पदोन्नत्यांबत शासनाकडे वारंवार मागणी केल्यानंतरही अद्याप दखल घेतली गेलेली नाही.




