ED Raid : ईडीची मोठी कारवाई ! मालेगावात 9 ठिकाणी केली छापेमारी

मालेगाव : ईडीकडून मालेगावमध्ये मोठे सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. मालेगावात ईडीकडून तब्बल ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. बोगस जन्म दाखला प्रकरणात अटक असलेले तव्वाब शेख यांच्या राहत्या घरी ईडीने छापा टाकला आहे. यामुळे मालेगावात एकच खळबळ उडाली आहे. मालेगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेले तव्वाब शेख हे बोगस जन्म दाखला प्रकरणात अटकेत आहे.
आता ईडीने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून झाडाझडती सुरू केली आहे. तर ईडीकडून मालेगाव शहरात एकूण ९ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या १६ वेगवेगळ्या एफआयआरच्या अनुषंगाने ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अवैध बांगलादेशी नागरिकांशी थेट संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर झाली होती. त्यांनी मालेगावातील बनावट दस्तावेजांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतरच पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला होता, ज्यामुळे आता ईडीकडून सखोल चौकशी होत आहे.
किरीट सोमय्यांनी केली होती तक्रार
मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा झाल्याचा दावा करत, मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे अनेकदा मालेगाव दौऱ्यावर आले होते. यानंतर शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. कामकाजात पुरेसे गांभीर्य न दर्शविता जन्मदाखले निर्गमित करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे व विद्यमान नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आले होते.





