अग्रलेख : कोण जिंकले, कोण हारले?
अमेरिका, इराण आणि इस्रायल या तीन देशांचा सहभाग असलेला लष्करी संघर्ष अखेर 107 दिवसांनी संपुष्टात (US-Iran War) आला आहे.

US-Iran War : अमेरिका, इराण आणि इस्रायल या तीन देशांचा सहभाग असलेला लष्करी संघर्ष अखेर 107 दिवसांनी संपुष्टात (US-Iran War) आला आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी लष्करी संघर्ष संपण्यावर एकमत दर्शवल्याने आता शुक्रवारी जिनिव्हा येथे उभय देशांमध्ये शांतता करार होईल आणि अधिकृतपणे या लष्करी संघर्षाला पूर्णविराम मिळेल.
अर्थात, गेल्या सुमारे तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीमध्ये या लष्करी संघर्षामुळे जगाला जो त्रास झाला त्याचा विचार करता या युद्धामध्ये ‘कोण जिंकले आणि कोण हारले?’ याचा आढावाही घ्यावा लागणार आहे. अमेरिकेसारखी महासत्ता (US-Iran War) समोर असूनही आणि इस्रायलसारखा शेजारीही आक्रमक पद्धतीने कारवाई करत असताना इराणने या दोन्ही देशांना झुंजवले आणि अखेर अमेरिकेच्या पुढाकारामुळेच युद्धविराम होत आहे.
जेव्हा अशा प्रकारचे एखादे युद्ध शांतता कराराच्या माध्यमातून थांबते तेव्हा जेता कोण आणि पराभूत कोण, याचा निर्णय घेणे अवघड जाते. पण ज्या प्रकारे या लष्करी संघर्षामध्ये इराणने अमेरिकेची कोंडी केली आणि त्यानिमित्ताने संपूर्ण जगालाही हादरा बसला ते पाहता इराणने अमेरिकेला हे युद्ध संपवण्यासाठी गुडघ्यावर आणले असेच म्हणावे लागते.
या शांतता करारामध्ये ज्या अटींचा समावेश आहे, त्या पाहता अमेरिकेच्या बाजूने फारसे काही हाताशी लागले आहे, असे नाही. बहुतेक सर्व अटी या इराणला धार्जिण्या अशाच आहेत. पण या अटी मान्य करण्याशिवाय अमेरिकेसमोर सध्या तरी पर्याय दिसत नाही. लष्करी संघर्षात इराणचे जे नुकसान झाले त्याचा विचार करून इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि मित्रराष्ट्र इराणला 300 अब्ज डॉलरचे विशेष अर्थसहाय्य करणार आहेत.
एवढेच नाही तर इराणचे 24 अब्ज डॉलर गोठवण्यात आले होते, त्यावरील निर्बंधही हटवण्यात (US-Iran War) येणार आहेत. इराणच्या सर्व वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळणार असून अमेरिकेने निर्बंध मागे घेण्याचे ठरवले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन अमेरिका या शांतता करारामध्ये देणार आहे.
अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाही आणि तिथून निघून जाईल अशी पण एक अट या शांतता करारामध्ये आहे. या अटींचा विचार करता सर्व अटी इराणला फायदेशीर अशाच आहेत. ज्या कारणासाठी अमेरिकेने हा लष्करी संघर्ष सुरू केला होता, त्यापैकी कोणतेही कारण पूर्ण झालेले नाही. अमेरिकेच्या दबावानंतरही इराणमधील राजवट कायम राहिली आहे.
उलट अमेरिका आता हस्तक्षेप करणार नाही असे आश्वासन इराणला मिळाले आहे. इराणच्या बाजूने नकारात्मक विचार करता या हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान झाले. एवढेच नाही असा इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह अनेक नेते आणि अधिकार्यांचाही मृत्यू झाला. इराणची अर्थव्यवस्था ज्यावर अवलंबून आहे ते तेल उत्पादन व वाहतुकीच्या सुविधासुद्धा अमेरिकेकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या.आता पुनर्बांधणीच्या निमित्ताने इराणला हे सर्व पुन्हा उभे करता येणार आहे.
अमेरिकेचा विचार करता फक्त इराणच्या अणू कार्यक्रमावर पुन्हा चर्चेची संधी अमेरिकेला मिळणार आहे हीच एक सकारात्मक बाब आहे किंवा होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे जागतिक पातळीवरील इंधन पुरवठ्याला दिलासा मिळणार आहे. इराणचा निर्णायक पराभव करण्यात अमेरिकेला अपयश आले आहे आणि इराणमधील धार्मिक राजवट कायम आहे हेसुद्धा यानिमित्ताने अधोरेखित होते.
एवढेच नाही तर या युद्धाच्या निमित्ताने इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक सामरिक अस्त्र म्हणून वापर करता आला आणि भविष्यातही अशाच प्रकारे हे अस्त्र वापरले जाईल असे संकेतही या निमित्ताने समोर येत आहेत. साहजिकच या युद्धामध्ये अमेरिकेला फारच तडजोड करावी लागली आहे आणि छोट्याशा इराणने नैतिक का होईना विजय मिळवला आहे.
अर्थात, 19 जून रोजी जेव्हा शांतता करारावर सह्या होतील, त्यानंतर इस्रायलची भूमिका काय असणार आहे हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. कारण हा शांतता करार आम्हाला मान्य नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया इस्रायलने आधीच व्यक्त केली आहे. दक्षिण लेबाननमध्ये तैनात असलेले आपलं लष्कर तेथे कायम राहील अशी भूमिका जाहीर केली आहे.
इराणने काही आगळीक केली तर आम्ही त्याला संपूर्ण उत्तर देऊ, असा इशाराही इस्रायलने दिला आहे. मुळात हा संघर्षच इराण आणि इस्रायल यांच्यामधील असल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार होऊन मध्य आशियात प्रत्यक्ष शांतता प्रस्थापित होईल का, हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरेल. कारण इराणचा अणू कार्यक्रम हा इस्रायलला उद्ध्वस्त करण्यासाठीच आहे, असाच दावा इस्रायलकडून सातत्याने केला जातो.
अमेरिकेने आपल्या बाजूने युद्ध थांबवले असले तरी इस्रायलकडून कायमची अशा प्रकारची युद्धबंदी होईल असे कोणतेही संकेत सध्या मिळत नाहीत. एक मात्र निश्चित आहे की, या 107 दिवसांच्या लष्करी संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था (US-Iran War) विस्कळीत झाल्या. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला. आता हा लष्करी संघर्ष थांबल्यामुळे इंधनपुरवठा सुरळीत होऊन सर्व अर्थव्यवस्था मार्गावर लागतील अशीच अशा करावी लागेल.
या लष्करी संघर्षामध्ये कोण जिंकले कोण हारले यावर चर्चा आगामी कालावधीमध्ये सुरूच राहणार असली, तरी जे हजारो बळी गेले त्यामुळे मानवतेचा मात्र निश्चितच पराभव झाला.






