Editorial : पश्चिम आशियातील युद्धाचे सावट दूर होण्याऐवजी परिस्थिती दिवसेंदिवस (Editorial) आणखीनच बिकट होत चालली असल्याची लक्षणे दिसत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ खुले करण्यासाठी इराणला अंतिम मुदत दिली. मुदतीनंतर इराणला आम्ही असा धडा शिकवू की इराण पाषाण युगात जाईल आणि त्यानंतर त्याला पुन्हा उभे राहण्यास कित्येक वर्षे लागतील, असा सज्जड इशारा ट्रम्प (Editorial) यांनी दिला आहे. त्यामुळे हे युद्ध आता आणखीनच गंभीर स्थितीत जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ट्रम्प यांनी इराणला जो सज्जड इशारा दिला आहे त्यात त्यांनी इराणला पूर्णपणे बरबाद केले जाईल असे स्पष्ट म्हटले आहे. ‘इराणला बरबाद करायला आम्हाला केवळ चार तास पुरेसे आहेत आणि ही कारवाई अगदी उद्या रात्रीसुद्धा होऊ शकते’ असे संकेतही त्यांनी दिल्याने संपूर्ण जग पुन्हा हवालदील झाले आहे. मध्यंतरी या युद्धात तडजोड होण्याची चिन्हे दिसू लागली होती. इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारीही काही देशांनी दाखवली होती आणि त्यानुसार हा संघर्ष संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे वाटत होते. पण आता पुन्हा हा संघर्ष आणखी कडवट झाला आहे. तिकडे इराणही अजिबात नमते घ्यायला तयार नाही. ट्रम्प यांच्याकडून दिल्या जाणार्या इशार्याला त्यांनी केराची टोपली तर दाखवली आहेच, उलट ट्रम्प यांच्या इशार्याची खिल्ली उडवून इराणने आपली अजूनही लढाईची ताकद कायम असल्याचे दाखवून दिले आहे. या संघर्षाचा केंद्रबिंदू गेल्या काही दिवसांपासून होर्मुझची सामुद्रध्वनी खुली करण्यावर केंद्रित झाला आहे. येथून सगळ्या जगाला इंधनपुरवठा करणारी जहाजे ये-जा करतात, पण इराणने ती वाहतूक बंद पाडल्याने जगात इंधनटंचाईचे संकट निर्माण झाल्याने त्यातून जगाला वाचवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प (Editorial) यांनी ही वाहतूक खुली करण्यासाठी इराणवर चौफेर दबाव आणला आहे. तथापि इराणची खूमखुमीही अजून कमी झालेली नाही, वाटेल ते नुकसान सोसून अमेरिकेशी दोन हात करण्याची आमची जय्यत तयारी आहे असे इराण भासवत राहिला आहे. Donald Trump ट्रम्प यांनी इराणला ज्या धमक्या दिल्या आहेत, त्यात त्यांनी पुढील काही तासांत इराणमधील सगळी वीज निर्मिती केंद्र उडवून देण्याचा तसेच जलपुरवठा करणारे प्रकल्प आणि पूल नष्ट करण्याचा इशारा दिला आहे. इराणी नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा मिळणे मुश्किल होऊ शकते याचा इराणने गांभीर्याने विचार करावा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. एकीकडे ट्रम्प यांच्या या धमक्या सुरू असतानाच ओमान देशाच्या मदतीने पडद्याआडून तडजोडीचे प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्याही काही वृत्तवाहिन्या देत आहेत, पण त्यात नेमके तथ्य किती हे कोणालाच छाती ठोकपणे सांगता येत नाही. अमेरिकेबरोबर आमची कोणतीही चर्चा सुरू नाही आणि अमेरिकेचा युद्धबंदीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असे इराणने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मध्यंतरी इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची पाकिस्तानात चर्चा होणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या, पण त्याही फोल ठरल्या. वर नमूद केल्याप्रमाणे ट्रम्प यांनी आता इराणवर निर्णायक घाव घालण्याची तयारी चालू केली असेल तर जगातल्या अन्य महाशक्तींना यात मध्यस्थी करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. कारण संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था या युद्धात मध्यस्थी करायला पूर्ण कुचकामी ठरल्याने ट्रम्प यांच्या तडाख्यातून इराण वाचवायचे असेल तर रशिया, चीन किंवा युरोपियन समुदायालाच आता निर्णायक पुढाकार घ्यावा लागेल. ट्रम्प यांची एकतर्फी दादागिरी आणखी किती काळ चालणार हा प्रश्नही जगाला भेडसावत आहे. पण यात गंमत अशी आहे की, जगातली कोणतीच शक्ती ट्रम्प यांच्या दादागिरीला आव्हान देण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे ट्रम्प सध्या आणखीनच चेकाळलेले दिसत आहेत. इराणसारख्या मोठ्या देशाचे भवितव्य डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका व्यक्तीच्या लहरीवर अवलंबून ठेवता कामा नये ही बाब आता जगातल्या अन्य देशांमधील नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवी. ट्रम्प यांच्या दादागिरीच्या विरोधात रशिया आणि चीन इराणच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र सुरुवातीच्या काळात निर्माण झाले होते, पण आज युद्धाला जवळपास 40 दिवस होऊनही यापैकी एकही देश समर्थपणे इराणच्या मदतीला आलेला दिसत नाही. इराणच्या मदतीला जाणे म्हणजे अमेरिकेच्या विरोधात थेट युद्धच पुकारले पाहिजे असे नाही, जगातल्या शक्तिशाली देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी थेट ट्रम्प यांच्याशी चर्चा करून यावर काही तोडगा निघतो आहे का हे पाहिले तरी खूप होणार आहे. पण जगातल्या कोणत्याच देशाचा नेता हे करताना दिसत नाही. आपण नाहक युद्धाच्या भानगडीत पडायचे नाही अशी कातडी बचाव भूमिका जगातल्या अन्य देशांनी घेतली असेल तर पश्चिम आशियातील या युद्धाची धगही आणखी अनेक वर्षे सोसण्याची तयारी उर्वरित जगाला ठेवावी लागेल. पश्चिम आशियातील या विनाशकारी संघर्षात बाकीचे सगळेच जग मूक दर्शक बनून नुसते बसून राहणे म्हणजे अमेरिकेला संपूर्ण जगावर एकतर्फी दादागिरी करायला मुभा देण्यासारखे आहे.