अग्रलेख : पाणीबाणी!
दुष्काळ आणि पाणीटंचाईचे (Water Scarcity) इतके गंभीर आव्हान आपल्यापुढे उभे आहे की, या पुढील आठ-नऊ महिने नेमके काय काय सोसावे लागणार आहे याची चिंता आतापासूनच निर्माण झाली आहे.

Water Scarcity : देशभर सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलने नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी जे अघोरी उपाय योजले आहेत त्यावरून देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी देशात खर्या अर्थाने जी आणीबाणी सुरू झाली आहे ती मात्र पाणीटंचाईची आहे.
दुष्काळ आणि पाणीटंचाईचे (Water Scarcity) इतके गंभीर आव्हान आपल्यापुढे उभे आहे की, या पुढील आठ-नऊ महिने नेमके काय काय सोसावे लागणार आहे याची चिंता आतापासूनच निर्माण झाली आहे. देशाच्या अन्य भागापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीटंचाईची स्थिती अत्यंत भयावह आहे. मागच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झाल्याची बातमी आली, त्यामुळे परतीचा पाऊस थोडा तरी हात देईल ही उरलेसुरली आशाही संपुष्टात आली आहे.
पावसाळा संपून जेमतेम एक महिना पूर्ण होण्याच्या आधीच पाणीटंचाईच्या (Water Scarcity) बातम्यांनी काहूर उठवले आहे. महाराष्ट्र सरकारने या सगळ्या गंभीर स्थितीची वेळीच दखल घेतली असून राज्यभर उपलब्ध पाणीसाठ्यात बचत करण्यासाठी सर्वच ठिकाणच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात लागू करण्याची सूचना केली आहे. त्याची ठिकठिकाणी आता अंमलबजावणी सुरू होत आहे. भविष्यातील आव्हानाच्या दृष्टीने ही उपाययोजना अत्यंत महत्त्वाची होती, या तत्परतेबद्दल महाराष्ट्र सरकारचे कौतुकच करावे लागेल.
केंद्राकडेही राज्याने या स्थितीबाबत पाठपुरावा केला असून केंद्रीय निरीक्षक पथकाने महाराष्ट्राच्या बर्याच भागाचा दुष्काळी पाहणीचा दौरा जवळपास पूर्ण करत आणला आहे. महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या नेमक्या स्थितीनुसार कोणत्या तालुक्यात किती टंचाई स्थिती आहे वगैरेची आकडेवारी आता जमवली जात आहे. दुष्काळावर उपाय करण्यासाठी केंद्राकडे जादा आर्थिक मदतही मागितली गेली आहे, ती मदत मिळेल तेव्हा मिळेल पण उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्यासाठीचे नियोजन राज्य सरकारने तातडीने हाती घेणे गरजेचे होते.
त्यानुसार उपाययोजना केली जात आहे ही एक चांगली बाब आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, पुण्यात आता आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे, त्यासाठी गुरुवार निश्चित करण्यात आला आहे. तातडीची गरज म्हणून ही उपाययोजना केली गेली त्यामुळे त्याला सामान्य नागरिकांनी लगेच आक्षेप घेण्याचे कारण नाही.
पण यावर काही जाणकारांनी एक महत्त्वाचा पर्याय सुचवला आहे तो असा की आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार असल्यामुळे लोक आदल्या दिवशी घरातली सगळीच लहान-मोठी भांडी पाण्याने भरून ठेवतात आणि ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशीही दोन दिवसांपूर्वी भरून ठेवलेली भांडी, पाणी शिळे झाले म्हणून मोरीत ओतण्याचाही प्रकार सर्रास घडतो, त्यामुळे एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा उपाय तितका परिणामकारक ठरत नाही. त्या ऐवजी रोज पाच ते दहा टक्के अशा प्रमाणात पाणी कपात केली तर ती अधिक परिणामकारक ठरेल असे काहींचे म्हणणे पडते.
यावर आता साधकबाधक चर्चा करून योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे. आजच बातमी आली आहे की खडकवासला धरण साखळीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आज तब्बल तीन टीएमसी इतके कमी पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीतील चारही धरणांमध्ये 29.4 टीएमसी इतका पाणीसाठा होता यंदा तो 26.8 टीएमसी वर आला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन टीएमसी इतके कमी पाणी आजच जाणवते आहे.
त्यामुळे उर्वरित पाण्याचे पुढील आठ-नऊ महिन्यांसाठी अत्यंत काटकसरीने नियोजन करावे लागणार आहे. उजनीसारखे धरण 100% भरले, त्यामुळे काही दिवसांपूर्वी लोकांच्या मनात समाधानाचे वातावरण होते, पण हे धरण 100% भरूनही सोलापूर जिल्ह्याला पुढील आठ-दहा महिने पुरेशा प्रमाणात पाणी पुरवले जाईल याची खात्री आज देता येत नाही अशी स्थिती आहे.
कारण, काही जणांच्या मते धरण वरकरणी भरलेले दिसत असले तरी धरणातील गाळ काढण्याचे काम अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने, गाळाने भरलेल्या धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. जिथे धरणांची पुरेशी व्यवस्था आहे तिथे निदान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फारसा उद्भवणार नाही. मात्र, मराठवाड्यासारख्या ठिकाणी कसा पाणीपुरवठा केला जाणार आहे याची मात्र चिंता तेथील नागरिकांना आत्तापासूनच लागली आहे.
केवळ माणसांसाठीच नाही तर जनावरांसाठीही हा दुष्काळ त्यांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो. कारण, जनावरांना लागणारा चारा आणि पाणी कुठून आणायचे हा प्रश्न या पुढील काळात दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, राज्य सरकारच्या यंत्रणा, हे सगळे घटक आपापल्या परीने कार्यरत राहतीलच पण या सगळ्यात मोठी जबाबदारी राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांची आहे. त्यांनी पाण्याचा (Water Scarcity) काटकसरीने वापर आतापासूनच सुरू केला पाहिजे, विशेषतः ही सूचना पुणेकरांना अधिक प्रकर्षाने करण्याची गरज आहे.






