अग्रलेेख : खेळाचे राजकारण
सध्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) यांच्या कारावासाबाबत वाद निर्माण झाला आहे. राजकारणाचा खेळ करणे ही जरी राजकारण्याची जुनी सवय असली तरी खेळात जेव्हा राजकारण येते तेव्हा त्या खेळाबाबतच शंका निर्माण होते.

Imran Khan : सध्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) यांच्या कारावासाबाबत वाद निर्माण झाला आहे. राजकारणाचा खेळ करणे ही जरी राजकारण्याची जुनी सवय असली तरी खेळात जेव्हा राजकारण येते तेव्हा त्या खेळाबाबतच शंका निर्माण होते.
पाकिस्तानने इम्रान खान (Imran Khan) यांच्या कारावासानिमित्त आणि त्यांच्या प्रकृतीच्या निमित्ताने जो वाद निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर खेळामध्ये राजकारण आणून आपली विकृत मनोवृत्ती पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी क्रिकेट सुरू आहे. या कसोटीच्या दुसर्या दिवशी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माईक आथरटन यांनी इम्रान खान यांचे इंग्लंडमधील दोन सुपुत्र कासिम खान आणि सुलेमान खान यांची मुलाखत घेऊन स्काय स्पोर्ट्सवर प्रसारित करण्याचे नियोजन केले होते. पण याबाबतचा टिझर प्रकाशित होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला.
ही जर मुलाखत दाखवली तर पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर उतरणार नाहीत अशी धमकीसुद्धा दिली. खरे तर इम्रान खान यांच्या मुलांनी दिलेली मुलाखत आणि क्रिकेट याचा अर्थार्थी काहीही संबंध नव्हता.
तरीसुद्धा क्रिकेटमध्ये राजकारण आणण्याची पाकिस्तानची सवय जुनीच असल्याने यावेळीसुद्धा तशीच भूमिका पाकिस्तानने घेतली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्येसुद्धा जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने विजेतेपद मिळवले तेव्हा भारताला विजेतेपदाचा चषक देण्यास पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी नकार दिला होता आणि ती ट्रॉफी ते पाकिस्तानात घेऊन गेले होते. अद्यापही ती ट्रॉफी पाकिस्तानातच आहे.
तत्कालीन कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानात येऊन ती ट्रॉफी घेऊन जावी अशी मागणी सातत्याने नकवी करत असतात. यावेळीसुद्धा इम्रान खान यांच्या मुलांनी आपल्या वडिलांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांना कारावासात दिल्या जाणार्या वागणुकीविषयी मतप्रदर्शन केले म्हणून पाकिस्तानच्या अंगाला मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी इंग्लंड बरोबरील आपले क्रिकेट संबंधही संकटात आणले. अर्थात स्काय स्पोर्ट्सने किंवा इंग्लिश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या या धमकीला न घाबरता स्काय स्पोर्ट्सवर ती मुलाखत प्रसारित केली आणि नंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानातही उतरले.
साहजिकच पाकिस्तानच्या धमक्या पोकळ असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अशा प्रकारचे राजकारण खेळात आणण्याची गरजच नव्हती. कारण इम्रान खानच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करणे यात कोणतेही पाकिस्तान विरोधी राजकारण नाही. गेल्याच आठवड्यामध्ये विविध देशातील क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र लिहून इम्रान खान (Imran Khan) यांची काळजी घ्यावी अशी मागणी केली होती. त्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी इतरही काही माजी कर्णधारांनी अशाच प्रकारची मागणी केली होती.
पाकिस्तानमधील माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद किंवा मोईन खान यांच्यासारख्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनीसुद्धा इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधील विद्यमान सत्ताधार्यांचे राजकीय विरोधक असल्यामुळेच इम्रान खान यांच्याबाबत पाकिस्तान सत्ताधार्यांकडून अशा प्रकारची भूमिका घेतली जात आहे हे उघड आहे.
2022च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला जेव्हा पराभव पत्करावा लागला, त्यानंतर लगेचच त्यांना विविध 100 गुन्ह्यांखाली तुरुंगात डांबण्यात आले होते. पाकिस्तानचा माजी पंतप्रधान म्हणूनसुद्धा आणि जगविख्यात क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार या सर्व भूमिका निभावणार्या इम्रान खान यांच्याबाबत पाकिस्तानी सत्ताधार्यांनी जरा सावध आणि मवाळ भूमिका घेणे अपेक्षित होते.
पण इम्रान खान तुरुंगात असले तरी त्यांचा तहरिक ए इंसाफ हा जो पक्ष आहे, त्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र अजूनही कार्यक्षम आहेत आणि इम्रान खान यांचे काम ते रस्त्यावर का होईना चालू ठेवत आहेत.
इम्रान खान तुरुंगाबाहेर येणे सध्याच्या पाकिस्तानच्या सत्ताधार्यांना परवडणारे नाही. म्हणूनच विविध प्रकारे इम्रान खान यांना त्रास होईल याबाबत पाकिस्तानच्या सत्ताधार्यांकडून जाणीवपूर्वक कारस्थाने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इम्रानच्या मुलांनी दिलेल्या मुलाखतीला आक्षेप घेण्यात आला. खरे तर स्काय स्पोर्ट्सने मुलाखत प्रसिद्ध करण्यापूर्वीच काही दिवसांपूर्वी अल जजिरा या वाहिनीनेसुद्धा इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत प्रसिद्ध केली होती. पण पाकिस्तानच्या सत्ताधार्यांकडून केवळ इंग्लंडमधील मुलाखतीबाबतच आक्षेप घेण्यात आला.
सर्वसाधारणप्रमाणे कोणत्याही छोट्या विषयाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचे धोरण आणि कारस्थान नेहमीच पाकिस्तानकडून राबवले जाते. ज्याप्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील असलेला काश्मीरचा विषय पाकिस्तान नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतो. पण जेव्हा पाकिस्तानचा अंतर्गत असलेला विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला जातो तेव्हा मात्र पाकिस्तानला वास्तवाचे भान येते, हेच इम्रान खान यांच्या या विषयावरून सिद्ध होताना दिसत आहे.
इम्रान खान यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने आक्षेप घेऊन पाकिस्तानने आपणहूनच इम्रान खान यांच्या विषयाचे जागतिकीकरण केले आहे आणि साहजिकच आता आगामी कालावधीमध्ये इम्रान खान (Imran Khan) यांची सुटका करावी किंवा त्यांना तुरुंगात योग्य वागणूक द्यावी अशा प्रकारची मागणी जास्त तीव्रतेने जोर धरताना दिसेल.






