अग्रलेख : माफीचे राजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरणार्या तरुणांना मी माफ करत आहे, अशा प्रकारचा इन्स्टाग्राम व्हिडिओ नरेंद्र मोदी यांनी जारी केल्यानंतर देशात ‘माफी’ या विषयावर आता राजकारण सुरू झाले आहे.

Narendra Modi : राजधानी नवी दिल्ली येथे जंतर-मंतरवर झालेल्या युवकांच्या आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरणार्या तरुणांना मी माफ करत आहे, अशा प्रकारचा इन्स्टाग्राम व्हिडिओ नरेंद्र मोदी यांनी जारी केल्यानंतर देशात ‘माफी’ या विषयावर आता राजकारण सुरू झाले आहे.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी न मागताच त्या तरुणीला आणि इतरांना माफ केले आहे. पण या तरुणांवर पोलिसांमार्फत अत्याचार करण्याची जी घटना झाली त्याबद्दल नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार कधी माफी मागणार आहे, असा सवाल आता विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. हा सवाल निश्चितच महत्त्वाचा आहे.
कारण माफी हा विषय नेहमीच दोन्हीही बाजूंनी असतो. माफी देणे आणि माफी मागणे या दोन्ही गोष्टी एखाद्या विषयाला पूर्णविराम देण्यासाठी महत्त्वाच्या असतात. नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करणार्या त्या तरुणीवर एफआयआर दाखल झाल्यानंतर त्या तरुणीने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. तशा प्रकारचा व्हिडिओसुद्धा आता जारी झाला आहे.
आंदोलनस्थळी काही लोकांनी मला प्रोत्साहित केल्यामुळे मी ही शिवीगाळ केली असे तिने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. साहजिकच आंदोलन करणार्या या तरुणीने आपली चूक मान्य करून जर माफी मागितली असेल तर आता सरकारनेसुद्धा आपली चूक मान्य करून समस्त तरुणाईची माफी मागायला हरकत नाही, असा संदेश या निमित्ताने निश्चितच मिळत आहे.
जंतरमंतरवर आंदोलन सुरू असताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कधीही त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती किंवा मतप्रदर्शनही केले नव्हते. पण आंदोलन संपल्यानंतर त्यांनी तरुणांच्या आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध प्रकारे व्हिडिओ जारी करण्यास सुरुवात केली आहे. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी हाच प्लॅटफॉर्म योग्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले असले, तरी एकूण आंदोलनाच्या निमित्ताने जी एक सामाजिक घुसळण झाली त्याचा अर्थ लक्षात घेऊन मोदी सरकारने माफी मागून हा विषय संपवायला काहीच हरकत नाही.
माफी मागणारा नेहमी मोठा होतो हा नियम भारतीय संस्कृतीने सार्या जगाला दाखवून दिला आहे. जंतर-मंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना जर काही बळाचा वापर झाला असेल किंवा अनुचित प्रकार घडले असतील, तर नरेंद्र मोदी आणि त्यांचे जवळचे सहकारी गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागायला काहीच हरकत नाही.
या आंदोलनाच्या निमित्ताने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमच्यासाठी माफी मागण्यासारखीच गोष्ट आहे, असे जर सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. स्पष्ट शब्दात माफी मागून दिलगिरी व्यक्त झाली तर विरोधकांच्या हातातील मुद्दाच निसटून जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंतर-मंतरवरील आंदोलन संपले असले तरी दोन्ही बाजूने याबाबतचे काही विषय जाणीवपूर्वक उपस्थित केले जात आहेत आणि क्रियेला प्रतिक्रिया म्हणून अनेक वादविवादही निर्माण होत आहेत.
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दगडफेकीतील दगडांवरील फिंगरप्रिंट्स घेऊन कारवाई करण्याबाबत जे विधान केले आहे तेसुद्धा असेच माफी मागण्याच्या पात्रतेचे आहे. जंतर-मंतरवरील तरुणांच्या आंदोलनामुळे सरकारला कधी नाही ते माघार घ्यावी लागली आणि एका मंत्र्याचा बळी द्यावा लागला ही गोष्ट अद्यापही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पचलेली नाही आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांची याबाबतची मळमळ बाहेर येताना दिसत आहे. त्यातून नवनवीन वाद निर्माण होत आहेत आणि सरकारची प्रतिमा अधिकच नकारात्मक आणि मलीन होऊ पहात आहे.
डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2005 मध्ये त्यांनी लोकसभेमध्ये 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंग्यांबद्दल जाहीर माफी मागितली होती. साहजिकच एखाद्या घटनेबद्दल सरकारने माफी मागणे म्हणजे काही वेगळी गोष्ट आहे असे नाही. उलट अनेक वेळा अशा प्रकारच्या माफीमुळे विषयाला पूर्णविराम मिळतो.
अधिक चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते. म्हणूनच राजधानीत जंतर-मंतर येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या आंदोलकांबाबत जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, तर त्याबाबत माफी मागणे सरकारला अवघड वाटू नये. एका बाजूला जर पंतप्रधान त्यांच्याबाबत चुकीचे शब्दप्रयोग करणार्यांना माफ करत असतील, तर दुसर्या बाजूने आंदोलकांवर झालेल्या अत्याचाराबद्दलही मोदी (Narendra Modi) यांनी माफी मागून विषय संपवण्याची हीच वेळ आहे. अन्यथा माफी विषयावरील हे राजकारण यापुढेही चालूच राहील.






