अग्रलेख : पेपरफुटीचे पेव
महाराष्ट्रात रविवार दिनांक 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिकाच फुटल्यामुळे (Exam Paper Leak) ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा विषय अद्यापही ताजा असतानाच ही नवी पेपरफुटी समोर आली आहे.

Exam Paper Leak : महाराष्ट्रात रविवार दिनांक 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिकाच फुटल्यामुळे (Exam Paper Leak) ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा विषय अद्यापही ताजा असतानाच ही नवी पेपरफुटी समोर आली आहे.
नीट परीक्षा (Exam Paper Leak) ही विद्यार्थ्यांची परीक्षा असते, तर टीईटी ही होणार्या शिक्षकांची किंवा सध्या काम करणार्या शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा असते. पण विद्यार्थी असो, होणारे शिक्षक असो किंवा विद्यमान शिक्षक असोत त्यापैकी अनेकांना शॉर्टकट पद्धतीनेच यश मिळवण्याची हौस असल्याने या दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत.
नीट पेपर फुटी प्रकरणी तपास सुरू आहे आणि बड्या बड्या धेंडांना अटकही करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रात टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने महाराष्ट्र सरकारनेसुद्धा त्याच धर्तीवर तपास करून या पेपर फुटीमागे कोणाचा हात आहे हे तपासायला हवे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची नियुक्ती (Exam Paper Leak) करण्याची घोषणा केली असली तरी या एकूण घटनाच विद्यार्थी आणि समस्त समाजाला मनस्ताप देणार्या आहेत हे नाकारून चालत नाही.
एखाद्या विशिष्ट दिवशी परीक्षा जेव्हा नियोजित झालेली असते तेव्हा परीक्षांर्थीची त्याच दिवशी परीक्षा देण्याची मानसिकता तयार झालेली असते. त्या निमित्ताने अभ्यास झालेला असतो आणि परीक्षा यशस्वीपणे देण्यासाठी उत्साहही वाढलेला असतो. पण जेव्हा पेपरफुटीमुळे अचानक परीक्षा पुढे ढकलली जाते तेव्हा या परीक्षार्थींची मानसिकता कशी असते याचा विचार परीक्षेचे नियोजन करणार्या सर्वांनी करायला हवा.
नंतर पुन्हा जेव्हा परीक्षा घेतली जाते तेव्हा ती परीक्षा देताना त्याच प्रकारचा उत्साह असतोच असे नाही. अनेक वेळा या परीक्षांच्या तारखांच्या निमित्ताने काही नियोजन केलेले असते. पर्यटन, लग्न समारंभ असे अनेक विषय या तारखा समोर ठेवूनच नियोजित केलेले असतात. पण जेव्हा अचानक परीक्षा रद्द होते आणि पुढील परीक्षा कधी होणार याची कोणतीच कल्पना नसते, तेव्हा सर्व वेळापत्रक विस्कळीत होते. पण सरकारच्या लेखी मात्र एक परीक्षा रद्द झाली तर आम्ही दुसरी परीक्षा गांभीर्याने घेऊ एवढाच विषय असतो.
पण परीक्षार्थींसाठी तो मात्र कमालीच्या मनस्तापाचा विषय असतो हे लक्षात घ्यावे लागेल. डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासाठी बारावीमध्ये चांगले गुण मिळाले तरी नीट किंवा तत्सम परीक्षा व्यवस्थित उत्तीर्ण होईपर्यंत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे नोकरी करणार्या सर्व शिक्षकांना किंवा शिक्षकाची नोकरी करण्याची इच्छा असणार्या सर्व युवकांसाठी ही परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे.
मुळात एखादी व्यक्ती जेव्हा शिक्षकी पेशा करण्याचे ठरवते तेव्हा त्याच्यासाठी पूर्वीच्या शिक्षण यंत्रणेमध्ये बीएड, डीएड किंवा एमएड असे शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून ठेवले आहेत. पण यापैकी कोणतीही पदवी जरी मिळवली तरी शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षा ही उत्तीर्ण व्हावीच लागते. काही वर्षे नोकरी करणार्या शिक्षकांनासुद्धा ही परीक्षा सक्तीची केली असल्यामुळे नियमित शैक्षणिक कामे सांभाळायची की परीक्षेचा अभ्यास करायचा ह्या द्वंद्वात अनेक जण चिंताग्रस्त होते. त्यातच हे पेपर फुटीसारखे प्रकार समोर येतात आणि त्यांच्या चिंतेत आणखी भर पडते.
अर्थात, डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची मनीषा बाळगणारे तरुण विद्यार्थी असोत किंवा शैक्षणिक पेशा स्वीकारलेले शिक्षक असोत त्यांच्यासाठी या परीक्षा जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढे महत्त्व सरकारी यंत्रणांना या परीक्षांबाबत वाटते की नाही याचीच शंका येते. काही वर्षांपूर्वी अनेक विद्यापीठांचे पेपर फुटायचे. पण आता पात्रता परीक्षेचेच पेपर जर फुटत असतील तर या सर्व यंत्रणा किती सडल्या आहेत याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.
सरकारने आता भविष्य काळामध्ये अशाप्रकारे पेपर फुटी होणार नाही यासाठी सर्वोच्च काळजी घ्यायला हवी किंवा या सर्व परीक्षांचे कर्मकांड अजिबातच बंद करायला हवे. खूप खूप वर्षांपूर्वी डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासाठी फक्त बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण असणे गरजेचे होते. शिक्षक होण्यासाठी बीएड, डीएड होणे गरजेचे होते.
सरकारला आता या नवीन परीक्षांची यंत्रणा सांभाळणे शक्य नसेल तर पुन्हा जुन्याच पद्धतीने हा विचार व्हायला हरकत नाही. नीटसारख्या परीक्षांच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची शैक्षणिक उलाढाल होत असल्याचे समोर आले होते. टीईटी परीक्षेसाठीसुद्धा आता कोचिंग क्लासच्या यंत्रणा सुरू झाल्या आहेत. म्हणजे सरकार एखादा निर्णय जेव्हा घेते तेव्हा त्या निर्णयाचा आपल्याला आर्थिक फायदा कसा होईल यासाठीसुद्धा काही यंत्रणा आपोआपच कार्यरत होतात हे लक्षात घ्यावे लागेल.
या यंत्रणाच पेपरफुटी किंवा कॉपी यासारख्या गैरमार्गाचा वापर करत असतात. साहजिकच सरकारला हे गैरप्रकार थांबवण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलावे लागतील किंवा अशा परीक्षांमधील पेपर फुटी टाळण्यासाठी या परीक्षा कायमच्या रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. शेवटी, नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातून महाराष्ट्र सरकारने काहीही धडा घेतला नाही, हे निश्चित.
कारण अशा प्रकारे पेपरफुटीचे प्रकार घडू नये यासाठी सरकार (Exam Paper Leak) स्तरावरून काहीही हालचाल झाली नसल्याचेही स्पष्ट होते. सध्या सत्ताधारी आमदार-खासदार पळवण्यातच व्यस्त असल्याने पेपरफुटी होऊ नये याकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळच नाही.






