अग्रलेख : विरोधी ऐक्याचा अजेंडा
नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) घटक पक्षांची बर्याच दिवसांनी बैठक झाली. बैठकीला उपस्थिती लक्षणीय होती. 25 राजकीय पक्षांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी तेथे उपस्थित होते, असे सांगितले जात आहे.

INDIA Alliance : नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) घटक पक्षांची बर्याच दिवसांनी बैठक झाली. बैठकीला उपस्थिती लक्षणीय होती. 25 राजकीय पक्षांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी तेथे उपस्थित होते, असे सांगितले जात आहे. हे सगळे आपापल्या राज्यात मातब्बर असे विरोधी पक्ष आहेत. या सर्वांनी आता एकजुटीने मोदी सरकारच्या विरोधात कंबर कसायचे ठरवले आहे.
प्राथमिक टप्प्यात त्यांनी पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला असून दर दोन महिन्यांनी देशाच्या विविध भागात इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) बैठका घेण्याचे नियोजनही केले आहे. हे सगळे त्यांनी केले असले तरी, भाजपाच्या धुरिणांकडून या ऐक्याला शक्य तितक्या प्रकारे खोडा घालण्याचाच प्रयत्न होणार आहे, ते आव्हानही आघाडी कसे पेलणार, हा मुख्य प्रश्न आहे.
कारण विविध राज्यातील मातब्बर प्रादेशिक पक्ष याआधीच फोडण्यात भारतीय जनता पक्षाच्या व्यूहरचनाकारांना यश आलेले दिसले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा सुरूंग लागला आहे. या प्रादेशिक पक्षांपुढे आता स्वतःच्या अस्तित्वाचाच धोका निर्माण झाला आहे, तथापि एक तत्त्व आणि धोरण म्हणून ते भाजपच्या विरोधात आजही ठामपणे उभे आहेत.
या पक्षांची राष्ट्रीय पातळीवर भक्कम एकजूट दिसली तरच त्याला राजकीय भवितव्य असू शकते अन्यथा सध्याच्या तत्त्वशून्य राजकारणात आणि सत्ताधार्यांच्या अघोरी वरवंट्यापुढे टिकाव धरण्याची मानसिक क्षमता फारच कमी पक्षांमध्ये उरली आहे. भाजपच्या वळचणीला जाऊन स्वतःचे अस्तित्व सुरक्षित करण्यातच अनेक जण आज धन्यता मानताना दिसतात.
उर्वरित लोकांपैकी जे ठामपणे भाजपच्या विरोधात किल्ला लढवण्याच्या विचारात असतात त्यांना केंद्रीय यंत्रणांमार्फत नोटिसा पाठवून किंवा छापे टाकून दमात घेतले जाते. या वरवंट्यापुढे तग धरण्याची क्षमता सध्या फारच कमी लोक दाखवत आहेत. अगदी अलीकडे आम आदमी पक्षासारखा एका विशिष्ट ध्येयाने काम करणारा पक्षसुद्धा फुटला.
राज्यसभेतील दहापैकी सात खासदार या पक्षाला सोडून गेले. काँग्रेसचे किती नेते भाजपने आत्तापर्यंत आपल्या गळाला लावले याची तर गणतीच नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि त्या पक्षावर अजूनही गांधी परिवाराचीच हुकूमत असल्याने हा पक्ष क्षीण झाला असला तरी, संपलेला नाही किंवा तो फुटीच्या उंबरठ्यावरही उभा नाही. त्यामुळे काँग्रेसच्या झेंड्याखाली निःसंशयपणे एकत्र येऊन भाजपाला समर्थ पर्याय देण्याची क्षमता इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये नक्कीच आहे, प्रश्न फक्त संघर्षाचा खडतर मार्ग पत्करण्यापुरता मर्यादित आहे.
एकदा हा मार्ग पत्करण्याचे धोरण निश्चित झाले की मग फारशी अडचण होणार नाही. त्यासाठी इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांना आपले मनोबल उत्तम राखावे लागेल. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, ही वस्तुस्थितीच आहे. पण समोर भक्कम पर्याय नसल्याने लोक केवळ नाईलाजानेच भाजपकडे पुन्हा वळू शकतात ही बाब इंडिया आघाडीतील नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी.
यापूर्वीची लोकसभा निवडणुकीही इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance)नेतृत्वाखाली लढवली गेली होती; पण त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र यायला काही राजकीय पक्षांनी खळखळ केली होती किंवा राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करायलाही या आघाडीतील काही घटक पक्ष तयार नव्हते. त्यामुळे आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीचे भक्कम नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनाही पडला आहे. आज मोदी सरकारच्या विरोधात केवळ एकटे राहुल गांधी अत्यंत धाडसाने आक्रमक प्रचार करीत आहेत.
मोदी सरकारच्या प्रत्येक अपयशावर काँग्रेसकडून नेमकेपणाने बोट ठेवले जात आहे, त्यांच्या पक्षाचेच प्रवक्ते सोशल मीडिया आणि टीव्ही मीडियातून इंडिया आघाडीची बाजू मांडताना दिसतात. त्या तुलनेत इंडिया आघाडीतील अन्य पक्षांची बाजू मात्र कमकुवत दिसते किंवा मोदी सरकारच्या विरोधात फार आक्रमकपणा दाखवण्यात हे बाकीचे पक्ष स्वारस्य दाखवत नाहीत. अर्थात, याची पक्षनिहाय कारणे वेगवेगळी आहेत, त्याची चर्चा येथे करण्याची गरज नाही.
केंद्रीय पातळीवर भाजपला नडण्याची क्षमता आत्तापर्यंत केवळ तृणमूल काँग्रेसमध्येच होती; पण आता त्या पक्षाचेच बारा वाजले असल्याने इंडिया आघाडीतील एकही पक्ष या आघाडीचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेचा राहिलेला नाही. ही वस्तुस्थिती सगळ्याच घटक पक्षांनी मान्य करून काँग्रेसकडे आणि त्यांचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्याकडे एकतर्फी नेतृत्व सोपवले तर ही आघाडी अधिक भक्कम होण्यास मदत होऊ शकते, पण तो राजकीय शहाणपणा या घटक पक्षाचे लोक दाखवतील काय, हा मुख्य प्रश्न आहे.
आताच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला द्रमुक आणि आम आदमी पक्ष हे दोन प्रमुख पक्ष उपस्थित नव्हते. त्याचे भांडवल करून इंडिया आघाडी कमकुवत झाल्याचा दावा भाजप आणि त्यांच्या समर्थक मीडियाकडून केला गेला. त्यात काही दम नव्हता, कारण काँग्रेसने तमिळनाडूत द्रमुकशी युती तोडून टीव्हीके पक्षाशी या आधीच घरोबा केला आहे आणि पंजाबात आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाची थेट लढत काँग्रेस पक्षाशीच होणार असल्याने हा पक्षही काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीत सामील होणे अशक्य आहे.
त्यामुळे या दोन पक्षानी इंडिया आघाडीशी फारकत घेण्याला तसे फार राजकीय महत्त्व नव्हते. एकूण राजकीय स्थितीचा लंबक आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे, त्यामुळेच या आघाडीत बेबनाव निर्माण करण्याचे प्रयत्न बाहेरूनच होणार हे स्पष्ट आहे. त्याच उद्देशातून दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात यापूर्वी जी वक्तव्यं केली होती त्याचे मोठे फलक लागले होते.
इंडिया आघाडी कमकुवत करण्यासाठी कोणत्या थराला जाऊन प्रयत्न केले जातील त्याची ती एक झलक होती. त्यामुळे केवळ निवडणुका आणि जागावाटप एवढ्यापुरते उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता अत्यंत एकसंधपणे आणि आपापसातील विश्वासाचे वातावरण अधिक मजबूत करून या आघाडीला भाजपप्रणित सरकारच्या विरोधात ठामपणे उभे रहावे लागेल. त्यासाठी आपली कार्यक्रम पत्रिका आणि अजेंडा त्यांनी आतापासूनच निश्चित करून लोकांपुढे एक समर्थ पर्याय उभा असल्याचे वातावरण निर्माण केले तरच त्याचा त्यांना लाभ होऊ शकतो.






