सामाजिक : आजची समाजव्यवस्था बदलावी!

आजच्या समाजाला राजकारण, द्वेष, सुडाची भावना, गैरसमज, महापुरुषांची विटंबना अशी भुंगारूपी विचारधारा कुरतडत आहे. समाजाला भेदभाव विचारविषयाची व्याधी झाली आहे. या व्याधीपासून समाजाला बरे करण्यासाठी कोणते बरे औषध वापरावे?
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण यंदा उत्साहात साजरा करत आहोत. या निमित्ताने रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, विज्ञान-तंत्रज्ञान या आणि अशा सगळ्या क्षेत्रात आपण प्रगतीचे किती पर्वत सर केले हे सांगितले जात आहे; मात्र आजही आपल्यातले पशूत्व संपुष्टात आल्याचे दिसत नाही. आपल्यावर प्रेम करत सर्वस्व अर्पण करणाऱ्या एखाद्या अभागी जीवाचे तुकडे करून ते घरातील फ्रिजमध्ये साठवण्यापर्यंतचे क्रौर्य माणसात आहे. अनैतिक संबंध, जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, आर्थिक देवाण-घेवाणीतून नात्यात निर्माण झालेले वैतुष्ट्य, असूया यामुळे माणूस माणसाच्या जीवावर उठतोय.
भौतिक सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात निर्माण झालेल्या असताना आणि सर्वप्रकारची साधने उपलब्ध असताना आपण आपले तारतम्य का गमावतोय? आजही हुंडाबळी जातात, मुलगी नको म्हणून गर्भपात होतात, नवजात अर्भके कचराकुंडीत टाकली जातात, जाती-जातीत संघर्ष होतात, धर्माचे राजकारण केले जाते, या सगळ्यात महापुरूषांचीही वाटणी केली जाते. जो तो आपापल्या सोयीनुसार आचरण करतो आणि वर निर्लज्जपणे देशभक्तीचा आव आणतो. अशी विषमता आणि विसंगती जपत जीवनव्यवहार सुरू आहे. मग पुन्हा आपल्याकडे सुराज्य कसे येणार आणि आलेच तरी सुधारक आगरकरांच्या म्हणण्याप्रमाणे ते कसे टिकणार?
आपल्या राष्ट्राला लाभलेली शौर्य आणि पराक्रमाची परंपरा खंडित झाली आहे की काय? असे चित्र सर्वत्र आहे. “मी आणि माझे’ या वृत्तीने कळस गाठल्याने “आपण समाज’ म्हणून काही विचार करतच नाही. महापुरूषांच्या विचारधारांवरून, त्यांच्या कार्यकर्तृत्वावरूनही आपल्यात मतभेद निर्माण झाले आहेत. प्रत्येकजण कुणाच्या तरी प्रभावाखाली जगतो. समाजमाध्यमांमुळे या सगळ्यांना खतपाणी घातले जाते. इतिहासाचे ज्ञान नाही, वर्तमानाचे आकलन नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही. त्यामुळे आजची तरूणाई एका अराजकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्यांच्याकडे काही स्वयंप्रज्ञा आहे आणि आर्थिक सुबत्ता आहे ते तरूण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विदेशात जाऊन स्थिरावत आहेत. हे ज्याला जमत नाही त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
नोकरी, उद्योगासाठी भांडवल अशा जंजाळात अडकलेला तरूण इथल्या व्यवस्थेच्या, राजकारणाच्या कचाट्यात अडकतो आणि त्यातच भरडला जातो. या दुष्टचक्रातून सावरताना त्याला मोठी कसरत करावी लागते. एकीकडे अशा दिशाहीन तरूणाईचे प्रमाण झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे काही ध्येयवादी तरूणही आहेत. त्यांचे प्रमाण मात्र अत्यल्प दिसते. वर्षानुवर्षे प्रतिकूलतेत आणि टोकाच्या विवंचनेत जगणाऱ्या या पिढीने आपल्या जगण्याचे इप्तिस हेरले आहे. प्रशासनाबरोबरच विविध क्षेत्रात तळपणाऱ्या अशा मोजक्या प्रज्ञावंतांनी परिस्थितीवर यशस्वी मात करून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्याकडे बघितल्यावर पुन्हा एकदा आशेच्या अंकुराची पालवी फुटते.
आकाशातून उत्तुुंग भरारी घेणाऱ्या घारीचे सारे लक्ष आपल्या पिलाकडेच असते. त्याप्रमाणे नवनवीन क्षेत्रात यशाचे मानदंड निर्माण करताना आपण माणूस म्हणून अंगी असलेले मूलभूत चांगुलपण जपले पाहिजे. स्वतःतील अवगुण बाजूला सारून स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि पर्यायाने समाजाच्या व्यापक उत्कर्षाची वेगळी वाट निर्माण केली पाहिजे. इतरांचे सुख-दुःख समजून घेतल्यास आपल्याही दुःखमुक्तीचा मार्ग मोकळा होईल. गरजेतून आलेल्या हतबलतेवर मात करण्याची कुवत आपल्यात निर्माण झाली तर चैतन्याचे नंदादीप प्रज्वलीत होतील.
“वादे वादे जायते तत्त्वबोधः’ अशा संस्कृतीची शिकवण असलेल्या आपल्या देशाला संपन्न विचारधारेचा वारसा लाभला आहे. सुधारक आगरकरांनीही म्हटले होते, “दुष्ट आचारांचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचारशलाकाखेरीज होत नाहीत.’ आज आपण मात्र अशा “विचारशलाका’ चेतवण्याऐवजी सातत्याने आपल्या वाचाळवीरतेचे प्रदर्शन घडवत आहोत.
सामान्य माणसापासून ते उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांपासून ते साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत अनेकांनी वेळोवेळी त्यांचा हिणकसपणा दाखवून दिला आहे. कोणतीही घटना घडली, कुणी काही मत व्यक्त केले की, त्यावर तातडीने व्यक्त होणे हे आपले जीवितकर्तव्य आहे, असा ग्रह करून घेतलेल्या प्रतिक्रियावाद्यांनी समाज आणि पर्यावरण गढूळ केले आहे.
अभ्यासाची, चिंतनाची वाणवा असताना केवळ लोकशाहीने दिलेला अधिकार सोयीस्कररित्या वापरायचा आणि आपण कसे संवेदनशील, विचारवंत आहोत हे दाखवायचे या अट्टहासामुळे आपले अपरिमित नुकसान होत आहे. हे थोपवण्यासाठी आपली सारासारविवेकबुद्धी जागृत असणे गरजेचे आहे.





