61 वर्षांपूर्वी प्रभात : आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाने सुटणार नाहीत

प्राथमिक शिक्षण मोफत-सक्तीचे मुंबई सरकारचे ध्येय
सांगली, ता. 3 – तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अखेरी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे, असे मुंबईचे शिक्षणमंत्री हितेंद्र देसाई यांनी निवेदन केले. जिल्हा दुय्यम शाळा शिक्षकांच्या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. शिक्षकांनी शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे असे सांगून ते म्हणाले, ग्रॅंट, पगार व फी या संबधी सरकारी धोरण इंटिग्रेशन कमिटीचे अहवालानंतर जाहीर होईल.
भारतीय बनावटीचा नवा रेल्वे डबा
मद्रास- सामान व उतारू यांचा समावेश होणारा पण वजनास हलका असा रेल्वे डबा भारतातील इंट्रिग्रल कोच फॅक्टरीत तयार झाला असून त्याची आज चाचणी घेण्यात आली. कारखान्यातून हा डबा रूळावर सोडण्याचा समारंभ उपरेल्वेमंत्री रामस्वामी यांच्याहस्ते उरकण्यात आला. 1957-58मध्ये 240 डबे करण्याचे लक्ष्य होते. पण प्रत्यक्षात 300 डबे तयार झाले आहेत. यंदा 330 डबे तयार करण्याचे लक्ष्य असले तरी 400 डबे तयार होतील, अशी आशा उपरेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केली.
वांशिक पक्षपाताची नवी तऱ्हा!
केपटाऊन – द. आफ्रिकन सरकारने वांशिक पक्षपाताची एक नवी मोहीम सुरू केली आहे. गौरेतरांचे सिनेमागृहांत जिथे निग्रो (संमिश्र वंशाचे) व हिंदी लोकांना प्रवेश मिळतो तेथे केपमधील आफ्रिकन नागरिकांवर प्रवेश बंदी लादण्यात आली आहे. त्यामुळे लांगा या गावातील एकाच सिनेमागृहाखेरीज इतरत्र सिनेमास जाणे आफ्रिकन लोकांना अशक्य झाले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाने सुटणार नाहीत
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाने सुटणार नाहीत. परस्पर सहिष्णुता-समझोत्याने, शांततामय मार्गानीच समाधानकारक तडजोड होऊ शकेल, असे संयुक्त पत्रक पंतप्रधान पं. नेहरू व घानाचे पंतप्रधान क्रूमा यांनी वाटाघाटीनंतर काढले आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने आज हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
बोट अपघातातील सर्व हिंदी खलाशी सुखरूप
मुंबई – ता. 1 जानेवारी रोजी कोचीनपासून वायव्येस 30 मैलावर “युका’ या युगोस्लाव्हियन बोटीशी एका पाडवाची टक्कर झाली. या अपघातात सापडलेले 8 हिंदी खलाशी “युका’ बोटीने येथे आज सुखरूपपणे आले आहेत. बुधवारी मध्यरात्री टक्कर झाली. हिंदी लोकांचा पाडाव बुडाला पण खलाशांना मात्र युकाचे कप्तानांनी सुरक्षितपणे वर घेतले.



