सिनेमॅटिक : विश्वविक्रमी कलाकार

मनोरंजन करण्याबरोबरच समाज प्रबोधनाचे कामही बॉलीवूडकडून केले जाते. त्याची दखल वेळोवेळी घेतली गेली आहे. एवढेच नाही तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने बॉलीवूडमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेत त्याची नोंद केली आहे.
गिनीज बुकमध्ये जगभरातील अनोख्या कामगिरीची नोंद होते. भारतीय सिनेमाची 2009 मध्ये गिनीज बुकमध्ये नोंद झाली. यामागचे कारण म्हणजे त्यावर्षी भारतात 24 वेगवेगळ्या भाषेत एकूण 1,288 चित्रपटांची निर्मिती झाली. यानिमित्ताने भारतीय चित्रपट इतिहासातील एक रंजक माहिती देता येईल. ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात 1964 मध्ये “यादे’ नावाचा चित्रपट आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात एकच कलाकार होता आणि तो म्हणजे सुनील दत्त. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते. या चित्रपटाच्या सुरुवातीला “वर्ल्डस फस्ट वन ऍक्टर मूव्ही’ अशी सूचना येते. यामुळे या चित्रपटाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.
अशोक कुमार : अशोक कुमार यांनी कारकिर्दीची सुरुवात 1936 मध्ये केली. जीवन नैय्या नावाच्या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पाऊल टाकले. त्यांनी शेवटचे 1980 मध्ये एका टीव्ही शोमध्ये काम केले. दीर्घकालीन करिअरसाठी त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदले गेले.
लता मंगेशकर : गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 25 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्याची दखल गिनीज बुकमध्ये घेण्यात आली आहे. त्याचवेळी संगीतकार बप्पी लहरी यांचे नावदेखील गिनीज बुकमध्ये आहे. त्यांनी एका वर्षात 33 चित्रपटांना संगीत देऊन विक्रम नोंदविला.
कपूर कुटुंबीय : कपूर कुटुंबीयांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नाव नोंदलेले आहे. 1999 पर्यंत हिंदी चित्रपट उद्योगाला कपूर कुटुंबाने 24 कलाकार दिले. हा एक विक्रम आहे. 1929 पासून कपूर कुटुंबीय बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. पृथ्वीराज यांच्यापासून रणबीरपर्यंत कपूर कुटुंबातील सदस्यांनी चित्रपटात काम केले.
आशा भोसले : गायिका आशा भोसले यांच्या नावावर 2011 रोजी अनोखा विक्रम नोंदवला गेला. त्यांनी यावर्षी 11 हजार गाण्याचा टप्पा पार केला. त्यात वीस भाषांत एकल, कोरस आणि युगुल गीतांचा समावेश आहे.
ललिता पवार : रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत मंथरा हे पात्र साकारणाऱ्या मराठी अभिनेत्री ललिता पवार यांनी आपल्या काळात अभिनयाचा ठसा उमटविला. सुंदर अभिनेत्री ते खाष्ट सासू अशा भूमिका ललिता पवार यांनी साकारल्या आहेत. ललिता पवार यांनी वयाच्या 12 व्या वर्षांपासून काम करण्यास सुरुवात केली आणि त्या वयाच्या 70 वर्षांपर्यंत काम करत होत्या. त्यांच्या नावावर दीर्घकाळ करिअर केल्याचा विक्रम आहे. ललिता पवार यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 700 चित्रपटांत काम केले.
दादा कोंडके : मराठी चित्रपटसृष्टीचे “दादा’ अशी ओळख असणारे दादा कोंडके. 1970-1980 च्या दशकात मराठी चित्रपटांचे हुकमी एक्का ठरलेले दादा कोंडके यांच्या सात मराठी चित्रपटांनी गोल्डन ज्युबली साजरी केली. त्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदले गेले. त्यानंतर आणखी दोन मराठी चित्रपटांनी गोल्डन ज्युबली साजरी केली. “आली अंगावर’ आणि “तुमचं आमचं जमलं’, या चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
अमिताभ बच्चन : महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभियाने देशालाच नव्हे तर जगाला भूरळ पडलेली आहे. विशेष म्हणजे बिग बींचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदलेले आहे. अभिनयाबरोबर ते भारदस्त आवाजासाठी देखील ओळखले जातात. त्यांनी 19 लोकप्रिय गायकांसमवेत हनुमान चालिसा म्हणत विक्रम नोंदविला. ते एकमेव कलाकार गायक ठरले. यात आदेश श्रीवास्तव, अभिजित, बाबूल सुप्रियो, हन्सराज हंस, कैलास खेर, के के, कुमार सानू, कुणाल गांजावाला, मनोज तिवारी, मुकुल अग्रवाल, प्रसून जोशी, रुपकुमार राठोड, शान, शंकर महादेवन, सोनू निगम, सुखविंदर सिंग, सुरेश वाडकर, उदीत नारायण आणि विनोद राठोड यांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नावावर एका विक्रमाची नोंद आहे. 2009 चा “पा’ या चित्रपटात अभिषेक बच्चन यांनी आपले वडील अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका वठविली. म्हणजे या बाप आणि मुलाने पडद्यावर नेमकी उलटी भूमिका साकारली. त्यामुळे अमिताभ आणि अभिषेक यांचे नाव गिनीजमध्ये नोंदले गेले.
शाहरुख खान : बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानने गेल्या तीन दशकांत एकाहून एक सरस चित्रपट बॉलीवूडला दिले. सर्वाधिक कमाई करणारा कलाकार म्हणून शाहरुख खानचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाली. गिनीज बुकच्या मते, 2012 मध्ये शाहरुख खानने 2.2 अब्ज रुपये म्हणजे 37.06 दशलक्ष डॉलरची कमाई केली. या विक्रमाला दहा वर्षे लोटली.
कतरिना कैफ : अलीकडच्या काळात आघाडीची नायिका म्हणून कतरिना कैफची ओळख आहे. तिचे नाव गिनीज बुकमध्ये असल्याचे वाचून आश्चर्य वाटू शकते. मात्र, शाहरुख खानप्रमाणेच तीदेखील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली. 2013 च्या आर्थिक वर्षात तिची कमाई 63.75 कोटी (10.7 दशलक्ष डॉलर) राहिली.
अभिषेक बच्चन : महानायक अमिताभ बच्चन यांचे चिरंजीव अभिषेक बच्चनचे नाव देखील गिनीजमध्ये आहे. दिल्ली-6 च्या प्रमोशनदरम्यान अभिषेक बच्चनच्या नावावर 12 तासांत वेगवेगळ्या शहरांना भेटी दिल्या. 1800 किलोमीटरचा प्रवास त्याने अगदी कमी वेळेत केला.
जगदिश राज : 1950 च्या दशकात बॉलीवूडमध्ये एंट्री करणारे कलाकार जगदिश राज यांना कोण विसरेल. अभिनेत्री अनिता राजचे वडील असणारे जगदिश राज यांनी तब्बल 144 चित्रपटांत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली. हा एकप्रकारचा विक्रमच आहे. अशी कामगिरी करणारे ते एकमेव अभिनेते ठरले.
गायक कुमार शानू : 1990 च्या दशकात आपल्या आवाजाने लोकांवर छाप पाडणारे कुमार सानू यांच्या नावावर एकाच दिवसांत 28 गाणे रिकॉर्ड केल्याचा विक्रम आहे.
सोनाक्षी सिन्हा : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या नावावर अनोखा विक्रम आहे. 2016 रोजी तिने एका इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. यात सोनाक्षीशिवाय 1327 महिला सहभागी झाल्या. सर्वांनी एकाचवेळी सर्वाधिक नेलपेंट लावण्याचा विश्वविक्रम केला.
अक्षयकुमार : अक्षयकुमारने चित्रपट “सेल्फी’च्या प्रमोशनदरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले. अक्षय कुमारने तीन मिनिटांत 183 सेल्फी घेऊन गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले.





