ज्ञानदीप लावू जगी : ठायीच बैसोनि करा एकचित्त ।
Updated On:

-ह.भ.प. आदिनाथ म. गुणारे
नामसंकीर्तन साधन पै सोपें । जळतील पापें जन्मांतरीची ।।
हरिनामसंकीर्तन करणे हे सर्व साधनांपेक्षा फार सोपे आहे. त्यायोगाने मागील अनेक जन्मांचे पाप जळून जातील. ह्या नामस्मरणावाचून दुसरे कोणतेही सायास करणे नको व रानावनात जाणे नको. ह्या योगाने नारायण सुखाने घरी येतो.
ठायीच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ।।
एका ठिकाणी बसून व एकचित्त करून मोठ्या प्रीतीने अनंतास आळवावे. “रामकृष्णहरि विठ्ठल केशवा’ ह्या मंत्राचा जप सर्वकाळ करावा. ह्यावाचून जर आणिक दुसरे काही साधन असेल तर मी विठोबाची शपथ वाहून सांगतो, असे तुकोबाराय म्हणतात.
माऊली म्हणतात की,
हरि उच्चारणीं अनंत पापराशी। जातील लयासी क्षणमात्रे ।। नामस्मरण करा, त्यायोगाने पाप नाहिशे होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल.





