अबाऊट टर्न : कशाचं चिन्ह?

एकाचे दोन पक्ष होणं, त्यातला खरा कुठला असा वाद निर्माण होणं, आपणच खरे, अस्सल, ओरिजिनल आहोत हे ठसवण्यासाठी आटापिटा आणि त्यासाठी पक्षाचं मूळ चिन्ह मिळवण्याचा प्रयत्न आणि या सर्व खटाटोपांमधून हाती लागलेलं वास्तव… हा सारा अगदी ताजा घटनाक्रम आहे.
कुणाला काय मिळालं, कुणी काय गमावलं, यावर प्रचंड चर्चा झालेली आहे. ज्यांना जे मिळालं त्यांनी ते स्वीकारलं, कारण अन्य पर्यायच नव्हता… पण या साऱ्या रणधुमाळीचा निष्कर्ष काय? सर्वसामान्य माणसाच्या हाती काय लागलं? अर्थात, हा शेवटचा प्रश्न अगदीच वेडगळपणाचा… कारण सामान्य माणसाच्या हाती कधीच काही गवसत नसतं, हे आजवर झालेल्या अनेक उलथापालथींमधून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे.
पण मग या घडामोडींमधून बोध काय घ्यावा? नैसर्गिक आणि अनैसर्गिक युत्या-आघाड्या यांच्या व्याख्या व्यक्ती आणि पक्षागणिक बदलत असतातच. त्यामुळे त्याही दिशेनं विचार करणं बावळटपणाचंच ठरेल. यातून आम्हाला पडलेले दोन ठळक प्रश्न असे आहेत, की पक्षचिन्हांसाठी एवढं भांडावं लागावं, एवढं त्यांना महत्त्व का असतं? आणि चिन्हांच्या या अदलाबदलीतून काय दिसून येतं. नुकत्याच झालेल्या घडामोडींमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं आणि एकाच पक्षाच्या एका गटाला मशाल आणि दुसऱ्या गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळालं.
गोठलेलं चिन्ह आणि मिळालेली चिन्हं यांचा विचार केला तर आपला देश खरोखर बदलत आहे, याची प्रचीती येते. कारण गोठलेलं चिन्ह असो वा दोन्ही गटांनी नव्यानं मागून घेतली गेलेली आपापली मनपसंत चिन्हं असोत, त्या चिन्हांमधून संघर्ष, युद्ध, टक्कर असेच अर्थ ध्वनित होतात. या पार्श्वभूमीवर, पूर्वीच्या पक्षचिन्हांकडे लक्ष गेल्यावाचून राहात नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपासूनचा इतिहास पाहिल्यास असं दिसतं की, आपलं चिन्ह शेती आणि शेतीशी संबंधित असावं, असा राजकीय पक्षांचा आग्रह राहिला आहे. भारतीय राजकारणावर पहिल्यापासून पकड घेणाऱ्या कॉंग्रेसनं बैलजोडी, गाय-वासरू अशी चिन्हं निवडली. पक्षाच्या गटांनीसुद्धा चरख्यासारखी चिन्हं निवडली.
अन्य पक्षांची चिन्हं बघितली तरी कंदील, सायकल वगैरे चिन्हांना पसंती दिल्याचं दिसून येतं. आपला देश कृषिप्रधान आहे आणि सर्वाधिक लोकसंख्याही शेतीवर अवलंबून आहे, याचं भान ठेवून ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबांमधील लोकांना आकर्षित करणारी चिन्हं राजकीय पक्षांनी निवडल्याचं दिसून येतं. ताज्या घडामोडींमध्ये ज्या चिन्हासाठी रस्सीखेच झाली, ते एक शस्त्र होतं आणि मागितलेल्या चिन्हांमध्येही शस्त्रांचा किंवा संघर्ष ध्वनित होईल अशा मशालीचा समावेश होता. आपल्या पक्षाचं चिन्ह निवडणं आणि जनमानसात रुजवणं ही पक्षांसाठी मोठी अग्निपरीक्षाच असते; परंतु चिन्हांच्या चॉइसमधला फरक मात्र जाणवल्याखेरीज राहात नाही.
वास्तविक, पक्षाला एक चिन्ह असावं, ते मनामनात रुजावं आणि त्यायोगे आपल्या पक्षाला अधिकाधिक मतं मिळावीत, ही मानसिकता अद्याप बदललेली नाही, याचं अधिक आश्चर्य वाटतं. वास्तविक ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, त्यांच्यासाठी चित्राची निवड केली गेली असावी. त्यातूनच पक्षचिन्हं आली. परंतु इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरसुद्धा विशिष्ट चिन्हांबाबत आग्रही असणं, चिन्ह रुजवण्यासाठी धडपड सुरूच राहणं, शिवाय त्यातून आक्रमकताच अधिक दिसून येणं, हे कशाचं चिन्ह?





