62 वर्षांपूर्वी प्रभात : “मेघदूताच्या’ नायकाचा कोल्हापुरात अवतार!

समितीच्या घटक पक्षांत मतभेद नाहीत
मुंबई, ता. 7 – संयुक्त महाराष्ट्र समितीच्या घटक पक्षांत मतभेद आहेत या म्हणण्याचा समितीचे अध्यक्ष भाई डांगे यांनी इन्कार केला. येथे काल रात्री जाहीर सभेत ते बोलत होते. सीमा सत्याग्रह चालू ठेवण्यास कम्युनिस्ट पक्षाचा विरोध आहे असे जे सांगण्यात येत आहे ते चूक आहे. कम्युनिस्ट पक्षाला हा लढा चालवावा असेच वाटते.
फक्त जनतेने सीमा सत्याग्रह हा संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याच्या लढ्याचा एक टप्पा आहे ऐवढे ध्यानी घ्यावे असे आमचे म्हणणे आहे, असा खुलासा करून भाई डांगे म्हणाले, सीमा सत्याग्रह, निवडणुका, पोटनिवडणुका अशा अनेक आघाड्यांवर हा लढा चालू ठेवण्याचे आम्ही ठरवले आहे. संयुक्त महाराष्ट्र केवळ निवडणुका लढवून मिळेल अशा भ्रमात राहू नका असा डांगे यांनी इशारा दिला.
स्वतंत्र बर्लिन योजना रशियाची भूमिका
वॉशिंग्टन – बर्लिन शहर स्वतंत्र ठेवल्यानंतर सर्व जर्मन नागरिकांना तेथे मुक्त प्रवेश मिळण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय कमिशनचे नियंत्रण राहावे, अशी रशियाची इच्छा असल्याचे रशियन उपपंतप्रधान श्री. मिकोयान यांनी येथे कामगार नेत्यांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी निर्माण झालेली तंगी नाहीशी करून या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असे मिकोयान म्हणाल्याचे जेम्स कॅरे यांनी सांगितले. कॅरे यांनी मिकोयान यांचे स्वागतार्ह एक खान्याचा समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ही बोलणी झाली.
“मेघदूताच्या’ नायकाचा कोल्हापुरात अवतार!
कोल्हापूर – महाकवी कालिदासाच्या “मेघदूत’ या जगप्रसिद्ध काव्यांतील नायकाने (यक्ष) आपल्या परमप्रिय पत्नीला विरहव्याकुळतेने मेघाद्वारे संदेश धाडला. कालिदासाच्या या नायकाचा नवा अवतार येथे निर्माण झाला आहे. या नव्या विरहव्याकुळ यक्षाचे नाव डॉ. गजाननराव जाधव. येथील सुप्रसिद्ध शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. गजाननराव जाधव व्हिएन्नाकडे निघाले होते.
भूमध्य समुद्राच्या मध्यावर ग्रीसजवळ बोट आली होती. डॉक्टरांनी पत्नीच्या नावे पत्र लिहिले आणि ते एका बाटलीत बंद करून ती बाटली समुद्रात टाकली. ती इटलीच्या किनाऱ्याला लागली. या आधुनिक यक्षाचे हे पत्र एका कोळ्याचे हाती लागले. त्याने बाटलीतील पत्रात लिहिलेल्या सूचनेप्रमाणे ते पत्र डॉ. गजाननराव जाधव यांच्या पत्नी लतादेवी जाधव यांना धाडले आहे. इटलीच्या समुद्र किनाऱ्याला ही बाटली ज्याला सापडली त्या कोळ्याचे नाव फ्रॅन्सिना कॅसिमा असे आहे.



