61 वर्षांपूर्वी प्रभात : कवींना स्फूर्ती देणारा जादु-ई-अग्निबाण!

भारतात लष्करी हुकूमशाही येण्याचा सुतराम संभव नाही
नवी दिल्ली 4 – भारतात लष्करी किंवा दुसरी कसली हुकूमशाही राजवट येईल या म्हणण्यात मुळीच तथ्य नाही, असा संरक्षणमंत्री श्री. कृष्णमेनन यांनी निर्वाळा दिला.
नव्यानेच स्थापन झालेल्या नागरिक व्यासपीठाचे सभेत बोलताना श्री. मेनन म्हणाले, भारतात लष्करी हुकूमशाही येईल असा विचार येथील जनतेच्या मनात येण्यासारखी सामाजिक परिस्थितीच नाही. येथे कोणी लष्करी राजवट स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर तेच संकटात सापडतील तथापि, देशाची सेवा करणाऱ्यांना बदनाम करण्यासाठी “असे काही होऊ घातले आहे’, अशी हवा पसरविण्यात येत आहे.
श्री. मेनन म्हणाले, आपली पार्लमेंटरी चौकट चांगली भक्कम आहे. आमचे संरक्षणदलही काही झोपलेले नाही. त्यांना लोकांची नाडी चांगली कळते. जेथे लष्करी राजवटीचा उदय होतो तेथील लोक जागृत नसतात. अधिकाराचा दुरूपयोग केला जातो. जनता आपल्या हक्कासंबंधी जागरूक नसते तेथे हुकूमशाही निर्माण होण्याचा धोका असतो, असे श्री. मेनन यांनी भाष्य केले.
आता माणसाला अंतरिक्ष प्रवास करता येईल!
मॉस्को – रशियाचा चंद्रवेधी अग्निबाण चंद्राला मागे टाकून सूर्याचे दिशेने चालल्याचे पाहून मानवाला आता अंतरिक्ष-प्रवास करणे शक्य होईल, असा विश्वास रशियन शास्त्रज्ञ व्यक्त करू लागले आहे. आता मंगळावरही अग्निबाण सोडणे शक्य होईल, असे शास्त्रज्ञ गुस्टाव्ह नान म्हणाले. सूर्यमालेत फिरणाऱ्या इतर ग्रहावर जाण्याची भाषा रशियन शास्त्रज्ञ बोलत आहे.
कवींना स्फूर्ती देणारा जादु-ई-अग्निबाण!
मॉस्को – रशियाच्या चंद्रवेधी अग्निबाणास अद्याप कोणतेही नाव देण्यात आलेले नाही पण भाष्यकार त्याला जादु-ई-अग्निबाण म्हणून संबोधतात. रशियन कवींनाही या अग्निबाणाने स्फूर्ती दिली असून मॉस्कोतील सुप्रसिद्ध लेखक अलेक्झी निकोलायेव्ह यांनी काल दूरदर्शनवरील भाषणात या चंद्रवेधी अग्निबाणावरून येणाऱ्या संदेशाची “चांदण्या रात्रीच्या भावकाव्याशी’ तुलना केली आहे आणि “सूर्याचा पृथ्वीनिवासी पहिला अतिथी’ म्हणून अग्निबाणाचा उल्लेख केला.



