अग्रलेख : मेस्सी द ग्रेट
फुटबॉल या सर्वात लोकप्रिय क्रीडा प्रकाराच्या महाकाय विश्वामध्ये अर्जेंटिनासारख्या छोट्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने फुटबॉल विश्वातून आपली निवृत्ती जाहीर केली.

Lionel Messi : फुटबॉल या सर्वात लोकप्रिय क्रीडा प्रकाराच्या महाकाय विश्वामध्ये अर्जेंटिनासारख्या छोट्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने फुटबॉल विश्वातून आपली निवृत्ती जाहीर केली.
त्यामुळे त्याच्या देशवासीयांनाच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अर्थात, मेस्सीचे (Lionel Messi) वय पाहता कधी ना कधी तो हा निर्णय घेणार होता हे उघडच होते. पण तो दिवस एवढ्या लवकर येईल असे चाहत्यांना वाटत नव्हते.
20 ते 25 वर्षांच्या कालावधीत फुटबॉल मैदानावरील आपल्या खेळाने चाहत्यांना आनंद देणार्या मेस्सीचे फुटबॉल मैदानावरील साम्राज्य अधिकृतपणे संपले आहे. तरी त्याने त्याच्या देशासाठी आणि तो ज्या क्लबचे प्रतिनिधित्व करत होता त्या क्लबसाठी जी कामगिरी करून ठेवली आहे, त्या कामगिरीच्या आठवणीच्या निमित्ताने चाहत्यांना त्याचा खेळ पाहण्याचा आनंद निश्चितच मिळणार आहे.
मोठा इतिहास असलेल्या फुटबॉल खेळासाठी ग्रेट खेळाडू ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या अनेक दशकांमध्ये फुटबॉलने अनेक महान खेळाडूंना समोर आणले. सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटू असलेल्या पेलेने फुटबॉलला कला बनवली, मेस्सीच्याच अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणार्या मॅराडोनाने (Lionel Messi) फुटबॉलला आक्रमकतेचा चेहरा दिला, ब्राझीलच्या कुफाने बचाव फळीतील खेळाडूंमधील गुणवत्ता दाखवून या खेळाला बुद्धिमत्ता दिली.
मेस्सीचा समकालीन असलेला पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने मैदानावर गोलचा विक्रमही केला. पण लिओनेल मेस्सीने या सर्वांचाच आदर्श घेऊन एक वेगळी शैली निर्माण करून फुटबॉलला परिपूर्णतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. फुटबॉलचे मोठे हिरवे मैदान जर एखादा कॅनव्हास मानला तर या कॅनव्हासवर आपल्या सुरेख पदलालित्याची चित्रकारी सादर करून चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी कामगिरी मेस्सीने अनेक वेळा केली आहे. म्हणूनच ‘मेस्सी द ग्रेट’ म्हणून हा महान फुटबॉलपटू नेहमीच ओळखला जाईल.
फुटबॉलच्या मैदानावर यशस्वी होणार्या बहुतेक खेळाडूंना संघर्ष करावा लागला आहे. मेस्सीसुद्धा अपवाद नव्हता. 24 जून 1987 रोजी अर्जेंटिनाच्या रोसारियो शहरात एका गरीब कामगार कुटुंबात जन्मलेल्या लिओच्या आयुष्याची सुरुवात संघर्षानेच झाली. वयाच्या अकराव्या वर्षी त्याला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले.
उपचारासाठी दर महिन्याला 900 डॉलर्सची आवश्यकता होती. स्थानिक क्लब रिव्हर प्लेटने त्याला संधी देण्यास नाकारले. कारण तो खूप लहान आणि अशक्त होता. हा नकार ऐकून मेस्सी खचून गेला नाही. त्याचे प्रयत्न सुरूच राहिले. फुटबॉल मैदानावरील परिश्रम आणि कामगिरीतील सातत्य त्याने कायम ठेवले. बार्सिलोना क्लबचे क्रीडा संचालक कार्लेस रेक्साच यांनी त्याचा खेळ पाहिला आणि एका हॉटेलच्या रुमालावर, टिश्यू पेपरवर त्याला करारबद्ध केले. हा रुमाल आज फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महागडा दस्तऐवज मानला जातो.
एवढेच नाही तर बार्सिलोनाने त्याच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला आणि ला मासिया या जगप्रसिद्ध अकादमीत त्याला घडवले. त्यानंतर मेस्सीने (Lionel Messi) कधीच मागे वळून पाहिले नाही. 2004 मध्ये वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी बार्सिलोनासाठी पदार्पण करणार्या या मुलाने पुढील अनेक वर्षे फुटबॉलच्या जगतावर अधिराज्य गाजवले. थक्क करणारी कामगिरी त्याने केली. त्याच्या काळात बार्सिलोनाने 10 ला लिगा विजेतेपदे, 4 चॅम्पियन्स लीग आणि असंख्य ट्रॉफीज् जिंकल्या. जगभरात त्याच्या खेळाची चर्चा सुरू झाली.
मेस्सीचा खेळ इतरांपेक्षा का वेगळा आहे, याचे उत्तर त्याच्या साधेपणात आहे. आजच्या आधुनिक फुटबॉलमध्ये जिथे ताकद, वेग आणि शारीरिक क्षमतेला महत्त्व दिले जाते, तिथे मेस्सी केवळ आपल्या मेंदूने आणि डाव्या पायाच्या जादूने खेळतो. त्याची ड्रिब्लिंग ही गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारी आहे. चेंडू त्याच्या पायापासून एक इंचही दूर जात नाही.
प्रतिस्पर्ध्याचे चार खेळाडू त्याला घेरतात, पण तो एखाद्या सापासारखा त्यांच्यामधून निसटून जातो. त्याचे गोल हे केवळ गोल नसतात, तर ती कलाकृती असते. असे अनेक गोल आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत आणि एखाद्या चित्रासारखे कोरले गेले आहे. गेटाफे फुटबॉल क्लब विरुद्ध केलेला मॅराडोनासारखा गोल असो किंवा 2009 च्या चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये मँचेस्टर युनायटेडविरुद्ध हेडरने केलेला गोल असो, चाहते त्याची कामगिरी कधीच विसरणार नाहीत.
या खेळाचे जे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पुनःपुन्हा पाहणारे चाहते आजही असतात. मेस्सी मैदानात असला तरी अनेक वेळा त्याच्या संघाला पराभवाचा धक्कासुद्धा सहन करावा लागला होता. 2014च्या वर्ल्डकप फायनलमध्ये जर्मनीकडून झालेला पराभव असो किंवा 2015 आणि 2016 मध्ये कोपा अमेरिकाच्या फायनलमध्ये झालेला पराभव असो, मेस्सीला अनेक वेळा टीकेलाही सामोरे जावे लागले. 2016 नंतर तर त्याने रडत रडत निवृत्तीही जाहीर केली होती. पण खरा नायक तोच असतो जो हार मानत नाही.
2021 मध्ये त्याने ब्राझीलला त्यांच्याच घरात हरवून कोपा अमेरिका जिंकली. 18 डिसेंबर 2022 चा तो ऐतिहासिक दिवस अर्जेंटिनाचे चाहते आणि कोट्यवधी फुटबॉल चाहते कधीच विसरणार नाहीत. कतारच्या लुसेल स्टेडियमवर, वयाच्या 35व्या वर्षी, मेस्सीने आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत 7 गोल आणि 3 असिस्ट करत त्याने अर्जेंटिनाला 36 वर्षांनंतर वर्ल्डकप मिळवून दिला.
फ्रान्सविरुद्धचा तो फायनल सामना हा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम फायनल सामना मानला जातो. त्या दिवशी त्याने केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचा आणि आपल्या देशवासीयांचाही विश्वास जिंकला. यावर्षी झालेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याने चांगली कामगिरी केली. मेस्सीने आपली निवृत्ती जाहीर केली तेव्हा त्याच्याकडे 8 बॅलन डी’ओर, 6 युरोपियन गोल्डन बूट आणि फुटबॉलमधील प्रत्येक शक्य असलेली ट्रॉफी आहे.
पण त्याला महान बनवणारी गोष्ट त्याचे (Lionel Messi) आकडे नाहीत, तर त्याची नम्रता आहे. मैदानावर तो राजा आहे, मैदानाबाहेर तो एक सामान्य पिता, एक सामान्य पती आहे. त्याच्या यशात कधीही अहंकार नाही आणि त्याच्या अपयशात त्याने कधीही दुसर्याला दोष दिला नाही.






