अग्रलेख : नेतृत्व बदल

सर्वसाधारणपणे राजकारणाच्या व्यासपीठावर नेतृत्व बदल हा विषय जोरकसपणे चर्चेला येतो. अशा नेतृत्व बदलानंतर उलट सुलट चर्चाही वाढत राहते. पण जेव्हा क्रिकेटच्या मैदानावरील नेतृत्व बदलाची चर्चा होते, तेव्हा तो वेगळा विषय ठरतो. भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग असलेला रोहित शर्मा याच्याकडून एकदिवसीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद काढून घेऊन शुभमन गिल यांच्याकडे दिल्यानंतर या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी रोहित शर्माला अशा प्रकारे कर्णधार पदावरून हटवायला नको होते अशी टीका केली आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या प्रमुख फलंदाजांनी निवृत्तीच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली असताना कसोटी क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमधून माघार घेतली होती. फक्त 50 षटकांचे एक दिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी त्यांची तयारी होती आणि या फॉरमॅटचे नेतृत्व रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले होते. रोहित शर्माची एक फलंदाज म्हणून आणि कर्णधार म्हणून कामगिरीसुद्धा लक्षणीय होती. पण आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर जात असतानाच या नेतृत्वात बदल करण्यात येऊन युवा खेळाडू शुभमन गिल याच्याकडे एक दिवसीय संघाचेही नेतृत्व देण्यात आले आहे.
क्रिकेटच्या तीन फॉरमॅट्सला तीन वेगळे कर्णधार असणे योग्य वाटत नाही असे कारण निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिले आहे. कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, टी 20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असे विभाग योग्य वाटत नाहीत असे अजित आगरकर यांचे म्हणणे आहे. मुळात जेव्हा टी-20 क्रिकेटचा उदय झाला आणि जास्त लोकप्रिय होऊ लागला तेव्हाच अशा प्रकारे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगळे कर्णधार नेमण्याचा विषय अनेक देशांमध्ये सुरू झाला होता.
आता भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आणि भारतीय निवड समिती यांच्यामध्ये मात्र तीनही क्रिकेट फॉरमॅटला एकच कर्णधार असावा असे वाटत असेल तर लवकरच टी-20च्या कर्णधार पदावरून सूर्यकुमार यादवची उचलबांगडी होऊ शकते. नुकत्याच झालेल्या आशिया करंड क्रिकेट स्पर्धेमध्ये उपकर्णधार म्हणून शुभमची जेव्हा नियुक्ती करण्यात आली तेव्हाच तसे संकेत मिळाले होते. दोन वर्षांनी होणार्या एक दिवसीय विश्वकरंडक स्पर्धेमध्ये रोहित शर्मा खेळेल की नाही याबाबत शंका असल्यामुळेच कदाचित हा नेतृत्व बदल करण्यात आला आहे. पण संघातील एक सहकारी म्हणून मात्र रोहित शर्माचे स्थान कायम ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत ज्याच्यावर सतत अन्याय होत आहे अशा प्रकारची चर्चा होत होती त्या श्रेयस अय्यरकडे एक दिवसीय क्रिकेट संघाचे उपकर्णधारपद दिल्यामुळे आगामी कालावधीमध्ये त्याच्याकडेही एखादी मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत या निमित्ताने समोर येत आहेत. खरेतर इतर बहुतेक देशांमध्ये या तीन फॉरमॅटसाठी तीन कर्णधार आहेत. किमान कसोटीसाठी वेगळा कर्णधार आणि टी-ट्वेंटी आणि एकदिवसीयसाठी वेगळा कर्णधार अशा प्रकारची विभागणीसुद्धा काही देशांनी केली आहे. पण शुभमनसारख्या युवा खेळाडूच्या हातात भारतीय क्रिकेटची सर्वच सूत्रे देण्याचा विचार निवड समिती करीत असावी असे या नेतृत्व बदलावरून वाटते.
रोहित शर्माशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे असा खुलासा जरी निवड समितीने केला असला तरी याबाबत रोहित शर्माने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. अर्थात, अनेक वर्षे क्रिकेट खेळणार्या आणि कर्णधार पद सांभाळणार्या रोहित शर्माला या सर्व प्रकारच्या बदलांची कल्पना आहेत. विराट कोहलीने ज्या सहजपणे कर्णधारपद सोडले आणि झटपट क्रिकेटमधील आपला सहभागही कमी केला त्याच प्रकारे रोहित शर्मासुद्धा हे सर्व बदल मनापासून आणि सहजपणे स्वीकारेल यात शंका नाही. मुळात तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकच कर्णधार असला तर त्याच्यावर मानसिक दडपण येऊ शकते या विचारातूनच वेगवेगळे कर्णधार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
शुभमनसारख्या युवा कर्णधाराला हे दडपण सहजपणे पेलता येईल असे कदाचित निवड समितीला वाटले असावे. या नेतृत्व बदलाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटही वेगळ्या आणि आधुनिक बदलाच्या दिशेने पावले टाकत आहे असे दिसते. अनेक युवा प्रतिभावान खेळाडू भारतीय संघामध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याने अशा प्रकारचे नेतृत्व बदल आणि संघबदल सहजपणे करणे भारतीय निवड समितीला शक्य होते. कसोटी कर्णधार म्हणून शुभमनने चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच्या वैयक्तिक फलंदाजीच्या कामगिरीवरही कोणता परिणाम झालेला नाही. साहजिकच आता आगामी कालावधीमध्ये झटपट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या बलवान संघांचे आव्हान पेलताना एक दिवसीय संघाचा कर्णधार म्हणून शुभमन किती यशस्वी होतो हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.





