अग्रलेख : महायुतीत अपक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत (Election) अपेक्षेप्रमाणे महायुतीचाच बोलबाला राहिला. नाशिक तेवढे अपवाद ठरले.

Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत (Election) अपेक्षेप्रमाणे महायुतीचाच बोलबाला राहिला. नाशिक तेवढे अपवाद ठरले. ज्या पद्धतीने महायुतीचे राज्यात तर त्यांच्या वरिष्ठ आवृत्तीचे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्रात वर्चस्व आहे ते पाहता विरोधकांना आता अशा निवडणुकांमध्ये किंवा कोणत्या निवडणुकांमध्ये वाव राहिला आहे असे दिसत नाही. तथापि, काही वेळा धक्कादायक निकालांचीही नोंद होते आहे.
त्यामुळे एकूण महायुती अथवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रकृतीवर जरी परिणाम होत नसला तरी मतदार मग ते आमदार-खासदार असोत किंवा सर्वसामान्य नागरिक, त्यांनी धक्का द्यायचा ठरवला तर ते देऊ (Election) शकतात. तसा सूचक इशारा नाशिकमधून महायुतीला मिळाला आहे, असे समजायला हरकत नाही. अर्थात हा ठरवून केलेला पराभव आहे की झालेला पराभव आहे हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. तरीही किमान नाशकातील निकाल वेगळा ठरला. महाविकास आघाडीची पीछेहाट अद्याप सुरूच आहे.
राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष आणि भाजप बंडखोराचा विजय झाला. त्यातही भाजप 11 जागा जिंकून मोठा भाऊ ठरला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 3, सुनेत्रा पावरांच्या (Election) राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने मिळालेल्या 2 पैकी 2 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 4 पैकी 3 जागा जिंकल्या. नाशिकची जागा शिवसेनेला सुटली होती. परंतु गोकुळ गिते यांनी बंडखोरी केली आणि त्याचाच फटका शिवसेनेला बसला.
नाशिकमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गिते यांनी पराभव केला. गिते हे गिरीश महाजन समर्थक आणि भाजपचे नेते गणेश गिते यांचे बंधू आहेत. गितेंची समजूत (Election) काढण्यासाठी गिरीश महाजन, उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून राहिले. चर्चेच्या डझनभरापेक्षा जास्त फेर्या झाल्यानंतर मतदानाच्या काही दिवस आधी गोकुळ गितेंनी प्रचार थांबवत असल्याचे जाहीरही केले. पण अर्ज मागे न घेतल्याने त्यांचे नाव मतपत्रिकेत कायम होते. त्यांनी त्यांची छुपी रणनीती सुरूच ठेवत या निवडणुकीत विजय मिळवला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या ‘सांगता येत नाही आणि सोसताही येत नाही’ या महानाट्याचा हा नवा अंक नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निकालाने लिहिला गेला. भाजपने अपेक्षेप्रमाणे इतर जागांवर बाजी मारली असली, तरी नाशिकमध्ये महायुतीला मिळालेली चपराक ही नुसती राजकीय हार नाही; तर तो दिल्ली आणि मुंबईच्या पक्षश्रेष्ठी संस्कृतीला स्थानिक पातळीवरून मिळालेला थेट इशारा आहे असेही समजले जाऊ शकते. नेत्यांनी वरून लादलेली युती किंवा आघाडी तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना मान्य असतेच असे नाही, याचे हे जिवंत उदाहरण.
युती यशस्वी होण्यासाठी खाली कार्यकर्त्यांची मने आणि मते जुळावी लागतात. ते मनोमिलन झाले नसेल आणि केवळ सभेत नेते भाषण देऊन गेले असतील तर त्याचा फारसा लाभ होत नाही. वरून चित्र असे दाखवले गेले की, सगळे आलबेल आहे पण मनभेद झालेले असले तर कोणाची मात्रा चालत नाही. त्यामुळेच राजकारणात जे दिसते, ते कधीच नसते आणि जे असते, ते दिसत नाही! गिते यांनी स्वतःचा प्रचार थांबवला असला, तरी त्यांच्या समर्थकांनी आणि पडद्यामागच्या सूत्रधारांनी त्यांचे कार्य चालूच ठेवले होते, हे आता निकालावरून स्पष्ट झाले आहे.
या निकालाने महायुतीमधील अंतर्गत अविश्वासालाही पुन्हा एकदा वाचा फोडली आहे. निकालानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आम्हाला पाठिंब्याचे आश्वासन मिळाले होते, मग मते कुठे गेली? असा सवाल करत निकाल संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. ठाकरेसेनेतील सहा बंडखोर खासदारांचे भाजपमध्ये न जाता शिंदेसेनेत जाणे जसे संशयास्पद आहे तसेच हे. हा संशय कोणावर आहे? ज्यांच्या खांद्याला खांदा लावून महायुती राज्याचा गाडा हाकत आहे, त्याच मित्रपक्षांचा परस्परांवर ना? शिंदेसेनेचे उमेदवार मतमोजणी केंद्रातून ज्या उद्वेगाने बाहेर पडले, ती उद्विग्नता वैयक्तिक नसून, मित्रपक्षांनी केलेल्या दगाफटक्याची आहे, हे उघड आहे.
सगळीकडून अनुकूल परिस्थिती असताना आणि आता आमदार होण्याची जय्यत तयारी केली असताना पराभवाचा सामना करावा लागल्यावर यापेक्षा वेगळे काही घडण्याची अपेक्षा नाही. नांदेडमध्ये अमरनाथ राजुरकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांच्या ताकदीच्या जोरावर तिसर्यांदा विजय मिळवला. औरंगाबाद-जालन्यात सुहास शिरसाट आणि उस्मानाबाद-लातूर-बीडमध्ये बसवराज पाटील यांनी भाजपचा गड राखला.
सहा जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे आकड्यांच्या खेळात महायुती जिंकली असली, तरी नाशिकच्या एका जागेने महायुतीमधील दिलजमाई किती तकलादू आहे, हे उघडे पाडले आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिकचा हा पॅटर्न अन्यत्र राबवला गेला तर तो अत्यंत चमत्कारिक ठरू शकतो.
काँग्रेस पक्ष जेव्हा राज्यात शक्तिमान होता तेव्हा केलेल्या अशाच पाडापाडीच्या आणि गटबाजीच्या राजकारणामुळे आज ते या अवस्थेपर्यंत पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात द्वेष भिनवल्यानंतर नेते भलेही जाहीर सभांमध्ये एकत्र येतील, एकमेकांच्या गळ्यात गळे घालतील; पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मनात असलेली खदखद आणि जागावाटपावरून झालेली धुसफूस जर अशीच बंडखोरीच्या किंवा छुप्या मतदानाच्या रूपाने बाहेर आली, तर युतीचा पायपोस राहत नाही.






