Rain : एप्रिल महिना संपत आला तसा विविध संस्थांचे हवामान विषयक अंदाज प्रसिद्ध झाले. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडेल असा सगळ्या संस्थांचा सूर आहे. काही जणांच्या मते, यंदा पावसाचे प्रमाण सरासरी इतकी असेल; पण बहुतांश ठिकाणी सरासरीच्या जेमतेम 92% इतकाच पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा (Rain) नेमका कसा असेल याविषयी आतापासूनच घोर निर्माण झाला आहे. नेहमीप्रमाणे पावसाला अडथळा आणणार्या एल निनोचा घटक याही वेळी उद्भवला आहे. त्यामुळे कमी प्रमाणात पाऊस पडेल असे सगळेच जण गृहीत धरून चालले आहेत. पावसाच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन प्रशासनाने वेळीच जागे होणे अपेक्षित असते, त्यानुसार सुदैवाने महाराष्ट्र सरकारलाही यंदा वेळेवर जाग आलेली दिसते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि त्यात त्यांनी पाण्याच्या (Rain) उपलब्धतेबाबत काही ठोस सूचना उपस्थित केल्या. त्यामध्ये जलयुक्त शिवाराची कामे तातडीने करणे, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा योजना तातडीने मार्गी लावणे, रोजगार हमी योजनेतून पाण्याचे तलाव खोदणे वगैरे कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. Weather update सरकार चालवणे म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवणे नसते किंबहुना हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी वेळीच दक्षता घेऊन सक्रिय राहणे यालाही तितकेच महत्त्व आहे. अलीकडे सरकार चालवणे म्हणजे केवळ राजकारणालाच महत्त्व देणे एवढेच राहिले आहे. एक जण काही बोलला की त्याला लगेच पर्याय म्हणून त्याच्या विरोधात आपला दुसरा एक जण उभा करायचा आणि टीव्हीवर चर्चेचे गुर्हाळ चालू ठेवायचे किंवा हेडलाइन मॅनेजमेंट करून दिवस मारून न्यायचा, असे प्रकार सध्या सर्रास होताना दिसत आहेत. मात्र अशा प्रकारातून गंभीर आव्हानांचा मुकाबला करता येत नाही, त्यासाठी वेळ आणि काळाचे भान राखून उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रात आता त्या दृष्टीने काही हालचाली सुरू झाल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले ही दिलासाजनक बाब मानली पाहिजे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात किंबहुना संपूर्ण जगातच आता पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. भूगर्भातून बेसुमार पाणी उपसा सगळीकडे सुरू आहे. पावसाचे पडणारे पाणी आडवणे आणि ते जमिनीत मुरणे हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात युद्धपातळीवर हाती घेतला गेला तरच पाण्याची उपलब्धता कायम राहील आणि वाळवंटीकरणाचा धोका आपल्याला रोखता येईल. पण उन्हाळा जवळ आल्यावरच आपल्याला पाणीटंचाईची चिंता सतावते. एकदा का व्यवस्थित पाऊस सुरू झाला की मग आपण सगळेच जण पाणीटंचाईची चिंता सोडून देतो. भूगर्भातील घटत चाललेल्या पाणीसाठ्याची आपल्याला आठवणही राहत नाही. पण असे करण्याने आपणच आपले जीवन संकटात टाकत असतो याची जाणीव नागरिकांना नसते. मुख्यमंत्र्यांनी नमूद केल्याप्रमाणे यंदा आपल्याकडे पावसाळा सुरू व्हायच्या आधीच 45 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापूर्वी एका वर्षी पावसाळा (Rain) संपल्यानंतर सुद्धा जेमतेम 45 टक्केच पाणीसाठा उपलब्ध होता. या पार्श्वभूमीवर यंदाची स्थिती फारशी चिंता करावी अशी नाही. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनबद्ध वापर केला तर आपल्याला यंदा कमी पाऊस पडला तरी पाण्याची टंचाई भासणार नाही, असे आश्वासक चित्र मुख्यमंत्र्यांनी निर्माण केले आहे. पण उपलब्ध पाणीसाठा नियोजनबद्धपणे वापरायचा म्हणजे नेमके काय करायचे याचीही रूपरेषा स्पष्ट होणे गरजेचे आहे. पुण्यासारख्या शहरात आजच पाणीटंचाई भासू लागली असून पाणीकपातीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची सूचना केली गेली आहे. मध्य पुण्यात पाण्याची स्थिती बरी असते पण दूरवरच्या उपनगरांमध्ये सध्याच कमालीची पाणीटंचाई निर्माण झाली असून लोकांनी हंडा मोर्चे काढायला सुरुवात केली आहे. अजून संपूर्ण मे महिना जायचा आहे. त्यामुळे हे पाणीटंचाईचे संकट उत्तरोत्तर आणखीन भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक केवळ चिंता व्यक्त करण्यापुरताच मर्यादित असतो, पण सगळीच जबाबदारी काही सरकारवर ढकलता येत नाही. पाण्याच्या काटकसरीने वापराचा पर्याय नागरिकांपुढे आहे, त्यानुसार नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडून अगदी काटेकोरपणे पाणी वापरले पाहिजे, ग्रामीण भागातील भूगर्भातला बेसुमार पाणी उपसा नियंत्रित केला पाहिजे. एवढी बेसिक काळजी जरी आपण घेतली तरी आपण या पाणीटंचाईचा समर्थपणे मुकाबला करू शकतो.