अग्रलेख : दमानियांचे आरोप

सिव्हिल सोसायटीच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया गेले काही दिवस पुन्हा नव्याने फॉर्मात आहेत. बीड जिल्ह्यात सरपंचाच्या हत्येचे प्रकरण घडल्यानंतर त्या अतिशय आक्रमकपणे या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत. हत्या प्रकरणाची तसेच बीडमधील असंख्य घोटाळ्यांच्या प्रकरणाची सुई राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जाते आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील विविध आरोपांचा जोरदार पाठपुरावा करीत पुराव्यासहित आरोपांचे सत्र सुरू केले आहे.
आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शेतकर्यांचा पीक विमा योजना आणि कृषी खात्याकडून करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या खरेदीत तब्बल पावणेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या संदर्भातील पुरावेही त्यांनी सादर केले आहेत. शेतकर्यांच्या मदतीसाठी ज्या वस्तू द्यायच्या होत्या, त्या वस्तूची रक्कम अनुदान स्वरूपात थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तरतूद असताना तो निर्णय रद्द करून या वस्तू शासनाने स्वतः खरेदी करून त्या शेतकर्यांना पुरवण्याचा निर्णय घेतला.
या प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असे अंजली दमानिया यांचे म्हणणे आहे. डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट योजनेअंतर्गत शेतकर्यांना त्यांच्या खात्यावर थेट पैसे दिले गेले असते, तर भ्रष्टाचाराला वाव राहात नाही म्हणून या डीबीटी योजनेलाच फाटा देण्याचा घाट धनंजय मुंडे यांनी घातला आणि त्यातून कोट्यवधी रुपयांची माया त्यांनी कमावली, असा अंजली दमानिया यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
खोटी कागदपत्रे सादर करणे, बॅक डेटेड चेक काढणे, डीबीटीच्या धोरणाला फाटा देणे, शेती साहित्य आणि उपकरणाची दामदुप्पट भावाने खरेदी करणे, असे सगळे आरोप करीत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आज नव्याने हल्लाबोल केला. याआधीही त्यांनी राख घोटाळा प्रकरणात आणि मुंडे तसेच वाल्मिक कराड यांच्या संयुक्त मालकीच्या कंपन्यांच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून पुरावे सादर केले होते. त्या पुराव्यावरून मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी अपेक्षा होती.
पण ती अपेक्षा काही फलद्रुप झाली नाही, त्यामुळे अंजली दमानिया यांनी आता मुंडे यांच्या विरोधात हे नवीन अस्त्र उपसले आहे. मुंडे यांनी कृषी खात्यात भरमसाठ पैसे खाल्ले असा थेट त्यांचा आरोप आहे. आज सकाळी दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तातडीने धनंजय मुंडे यांनीही दुसरी पत्रकार परिषद घेत दमानिया यांच्या आरोपाचा इन्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच कृषी खात्यातील या खरेदी प्रक्रियेचा निर्णय झाला, असा मुंडे यांचा दावा आहे.
आपण काहीही चुकीचे केलेले नाही, आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे, गेले सुमारे 58 दिवस आपल्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे वगैरे आरोप करत त्यांनी दमानिया यांचे आरोप धुडकावून लावले. त्यांची पत्रकार परिषद पाहून पुन्हा अंजली दमानिया यांनी संध्याकाळी आणखी एक पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्याच्या संदर्भातील आणखी काही कागदपत्रे आणि जीआर सादर करत आपल्या आरोपांना पुष्टी दिली आहे.
राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून धनंजय मुंडे हे सतत वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. संपूर्ण बीड जिल्ह्यात जो भ्रष्टाचार आणि दहशत गेल्या काही काळापासून आहे, त्याच्या बातम्यांनी रोज वर्तमानपत्रे भरलेली असतात आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही तोच विषय रंगलेला असतो. खरं म्हणजे या विषयाचा आता कडेलोट झाला आहे. पण तरीही धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नाहीत आणि राज्याचे सरकार तसेच मुंडे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाहीत.
त्यामुळे दमानिया आणि मुंडे यांच्यातील संघर्ष इतक्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. केवळ दमानियाच नव्हे तर सुरेश धस आणि अन्य पक्षांचे आमदारही धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने नवनवीन आरोप करीत आहेत. या सगळ्या आरोपांची आता कसोशीने चौकशी होऊन नेमकी वस्तुस्थिती लोकांपुढे आणण्याची गरज आहे. मुंडे यांची चौकशी होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सगळ्याच बाजूने होते आहे.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा सत्तेत येऊ शकतात. त्यामुळे ही मागणी फार गैर आहे, असे मानता येणार नाही. ज्यांच्यावर आरोप आहे तो माणूसच सरकारमध्ये मंत्रिपदावर बसलेला असेल तर चौकशीला मर्यादा येतात. किंबहुना चौकशी दडपण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून होऊ शकतात आणि तपास अधिकार्यांवरही दडपण येते हे अगदी साहजिक आहे.
त्यामुळे आत्तापर्यंत झाली ती शोभा खूप झाली यातून आपल्या पक्षाची आणि सरकारचीही बदनामी होत आहे याची जाणीव मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी ठेवण्याची गरज आहे. कोणी चुकीचे काही करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, हे अजितदादा यांचे लाडके वाक्य आहे. हे वाक्य ते नेहमी ऐकवत असतात. या भूमिकेविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करायचा असेल, तर चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे इष्ट ठरेल.





