अग्रलेख : केमिकल लोचा
विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी जनरेशन झेडबाबत हे विधान केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.पण त्यांनी जो प्रश्न निर्माण केला आहे तो वास्तव आहे आणि त्यावर चर्चा होणे गरजेचेच आहे.

Vishwas Nangare Patil : सध्याची जनरेशन झेड विषयी बोलणं किंवा त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं अतिशय अवघड झालं आहे. कारण, सततच्या स्क्रीन टाइममुळे त्यांच्या मनात आणि मेंदूमध्ये केमिकल लोचा निर्माण झाला आहे, असे मत नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी व्यक्त केल्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.
ज्याप्रकारे हा वाद निर्माण झाला आहे ते पाहता नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्या विधानातील पूर्वार्धातील मत निश्चितच योग्य आहे की काय अशी शंका येते. कारण, जनरेशन झेडने जंतर मंतरवर आंदोलन यशस्वी केल्यानंतर त्यांच्या एकूण मानसिकतेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याबाबत सर्वत्रच सावधपणा दिसत आहे. ही जनरेशन झेड चुकत असेल तर ती चूक आहे, असं सांगणंसुद्धा चूक आहे की काय हेच नांगरे पाटील यांना आपल्या मनोगतातून व्यक्त करावयाचे आहे.
सातत्याने मोबाइल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर असणार्या जनरेशन झेडचा स्क्रीन टाइम जास्त आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जो माहितीचा महापूर जनरेशन झेडच्या समोर येत आहे त्या माहितीचा खरा अर्थ लावण्यापूर्वीच त्यावर व्यक्त होण्याचा कल बहुतेकांचा असल्यामुळे या क्रिया प्रतिक्रियांच्या खेळातून समज, गैरसमज निर्माण होतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मिळते ते बहुतांशी ज्ञान नसते तर, अनेक वेळा माहितीच असते आणि ही माहिती तपासून घेतली तरच त्याचे ज्ञानात रूपांतर होते. पण जनरेशन झेड असो किंवा मोबाइल व्यवस्थित वापरणारी मागील पिढी असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध होणारी माहिती तपासून बघण्याकडे कोणाचाच कल नाही.
एका दिवसामध्ये किंवा ठराविक कालावधीमध्ये इतकी प्रचंड माहिती मेंदूमध्ये जमा होते की त्यामधून जर खरोखरच काही केमिकल लोचा निर्माण झाला तर त्यात आश्चर्य असे काही नाही. विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी जनरेशन झेडबाबत हे विधान केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.पण त्यांनी जो प्रश्न निर्माण केला आहे तो वास्तव आहे आणि त्यावर चर्चा होणे गरजेचेच आहे.
ज्या प्रकारे जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या कालावधीमध्ये सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवरील प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या, अश्लील मिम्स तयार करून नेत्यांचा अवमान केला जात होता, ते पाहता माहितीच्या महापुरामध्ये वाहून गेलेल्या सर्वांच्याच मेंदूमध्ये जर अशा प्रकारचा केमिकल लोचा निर्माण झाला असेल तर आश्चर्य वाटायला नको.
नांगरे पाटील यांनी जो विचार समोर मांडला आहे तो जनरेशन झेडवरील टीका म्हणून घेता कामा नये. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, हॉटेलमध्ये, बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर किंवा जेथे गर्दी असते त्या ठिकाणच्या दृश्यावर जर नजर टाकली तर केवळ जनरेशन झेडच नाही तर मागील पिढीतील नागरिकही हातात मोबाइल घेऊन सातत्याने स्क्रीनवर नजर टाकतानाच आढळतात. यालाच स्क्रीन टाइम असे म्हणतात.
प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे आणि त्याने आतापर्यंत केलेल्या स्क्रोलिंगप्रमाणे आणि सर्चप्रमाणे त्याला विविध माहिती सोशल मीडियावर उपलब्ध होत असली तरी माहिती तपासून पाहण्याचे भानही अनेक वेळा स्क्रोलिंग करणार्याला नसते. सोशल मीडियाच्या आधुनिक शास्त्राप्रमाणे ‘फियर ऑफ मिसिंग आउट’ नावाचा एक सिंड्रोम किंवा लक्षण नेहमी चर्चेत असते. यालाच ‘फोमो’ असे म्हणतात.
म्हणजे आजूबाजूला ज्या काही घटना घडल्या आहेत त्यापासून आपण अलिप्त राहता कामा नये, अशी एक अंतर्गत भीती सोशल मीडिया वापरणार्यांना असते. आजूबाजूला जे काही घडते आहे त्याची आपल्याला माहिती मिळायलाच हवी, मिळाली नाही तर आपण काहीतरी मिस करू अशी एक विनाकारण भीती सर्वांचे मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच जी नवीन माहिती निर्माण होत आहे ती आपल्याला मिळायलाच हवी या आग्रहाने किंवा आपण समाजापासून दूर जात नाही ना या भीतीतून स्क्रीन टाइम वाढत चालला आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचे नुकसानच होते या अर्थाची अती तेथे माती ही म्हण प्रसिद्ध आहे. त्याचाच विचार या अतिरेकी पद्धतीच्या स्क्रीन टाइमबाबत करावा लागणार आहे. नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी आपल्या भाषणामध्ये फक्त जनरेशन झेडचा उल्लेख केला असला तरी मोबाइल वापरणार्या सर्वांचा स्क्रीन टाइम वाढत चालला आहे आणि मीडियाच्या आहारी गेलेला नेटिझन आसपास असणार्या खर्या समाजापासूनसुद्धा दूर चालला आहे हे वास्तव स्वीकारावे लागेल. परदेशातील अनेक ठिकाणी शाळा किंवा महाविद्यालयीन पातळीवर मोबाइलचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर काही ठिकाणी किती काळ मोबाइल वापरायचा याबाबत काही बंधने घालण्यात आली आहेत.
विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी जे मत व्यक्त केले ते जनरेशन झेडचे जंतरमंतरवरील आंदोलन झाले नसताना व्यक्त झाले असते, तर त्या मताचा सर्वांनी आदर केला असता आणि स्वागतही केले असते. पण गाजत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे मत व्यक्त झाल्यामुळे नांगरे पाटील यांना टीका सहन करावी लागत आहे.
अर्थात, विश्वास नांगरे पाटील यांचा संदर्भ चुकला असेल आणि मत व्यक्त करण्याची वेळ जरी चुकली असेल तरी त्यांनी जे विचार मांडले आहेत, ते चुकीचे आहेत असे म्हणता येत नाही.






