अग्रलेख : सुवर्ण कामगिरी
जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) भारताने चौथा क्रमांक पटकावून चांगली कामगिरी केली, त्याबद्दल या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व क्रीडापटूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करावेच लागेल.

Asian Games 2026 : जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) भारताने चौथा क्रमांक पटकावून चांगली कामगिरी केली, त्याबद्दल या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व क्रीडापटूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करावेच लागेल.
या स्पर्धेत (Asian Games 2026) 21 सुवर्णपदके, 27 रौप्यपदके आणि 37 कांस्यपदके मिळवून भारताने चौथा क्रमांक पटकावला. पण गेल्या वेळी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत भारतीय संघाची कामगिरी थोडी कमी झाली हे वास्तवसुद्धा मान्य करावे लागते.
कारण, 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने 28 सुवर्णपदकांसह एकूण 107 पदके मिळवून चौथा क्रमांक पटकावला होता. यावेळीसुद्धा भारताने चौथाच क्रमांक पटकावला असला, तरी सुवर्णपदकांची कमाई कमी झाली आहे आणि एकूण पदकांच्या संख्येतही घट झाली आहे. अर्थात, काही झाले तरी इतर बलाढ्य देशांच्या तुलनेत भारताने चौथा क्रमांक मिळवला हेसुद्धा कमी नाही.
पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर असलेला चीन, जपान आणि कोरिया यांनी केलेल्या कामगिरीच्या तुलनेत भारताची कामगिरी थोडीफार कमी असली, तरी आगामी कालावधीमध्ये सुधारणा होण्याचे संकेत निश्चितच प्राप्त होत आहेत.
या स्पर्धेत (Asian Games 2026) भाग घेतलेल्या आणि पदके मिळवलेल्या अनेक खेळाडूंची आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने आता या सर्व खेळाडूंनी आणि संबंधित संघानी आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून आतापासूनच तयारी करायला हवी.
ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत आशियातील चीन, जपान, कोरिया या प्रमुख देशांव्यतिरिक्त अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आणि रशिया यांसारख्या मोठ्या देशांचाही सहभाग असते. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरीसुद्धा सुधारत असली, तरी भारत देशाचा एकूण आवाका पाहता ती खूपच कमी आहे हेसुद्धा वास्तव आहे.
साहजिकच येत्या बारा वर्षांमध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा भरवायचे स्वप्न जर आपण पाहात असू तर यानंतर होणार्या प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी अत्यंत चमकदार सुवर्ण कामगिरी करणे अपेक्षित आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतीय क्रीडा क्षेत्रातील टॅलेंट समोर आले आहेच.
क्रिकेट या नेहमीच्या क्रीडा प्रकारात भारताच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी सुवर्णपदके मिळवलीच. पण या व्यतिरिक्त भारतीय क्रीडापटूंनी तिरंदाजी, मुष्टियुद्ध, कुस्ती, गोल्फ अशा अनेक इतर क्रीडा स्पर्धांही चांगली कामगिरी करून पदकं मिळवली हेसुद्धा महत्त्वाचे आहे.
अनेक खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरी करून काही विक्रमांची नोंदही केली आहे. साहजिकच या खेळाडूंना जर आतापासूनच योग्य प्रोत्साहन आणि उत्तेजन आणि सरकारचे आर्थिक पाठबळ मिळाले, तर आगामी सर्व जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये (Asian Games 2026) या खेळाडूंकडून अधिक उज्ज्वल कामगिरी निश्चितच अपेक्षित करता येते.
क्रिकेट या एकमेव खेळाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळत असताना आणि या खेळामध्येही भारताने सुवर्ण कामगिरी केली असताना, इतर सर्वच क्रीडा प्रकारांना समान महत्त्व देण्याची वेळ आता आली आहे.
ऑलिम्पिकमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय हॉकी संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. या एशियन गेम्समध्ये भारतीय हॉकीच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी सुवर्णपदक मिळवले असल्याने हॉकी या भारताच्या राष्ट्रीय खेळामध्येही आगामी कालावधीमध्ये आणखी चमकदार कामगिरी होण्याचे संकेत मिळत आहेत.
पण ज्या प्रकारे क्रिकेट नियामक मंडळ किंवा भारतीय क्रिकेट निवड समिती या प्रमुख संस्थानी गेल्या काही वर्षांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करून भारतीय क्रिकेटमध्ये बदल केले आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाला एक नंबरवर नेऊन ठेवले, त्याच प्रकारची कामगिरी इतर सर्व क्रीडा प्रकारांमध्ये होणे गरजेचे आहे.
सरकारी पातळी होणारे योग्य नियोजन,योग्य क्रिडा संघटक यांच्या हातात दिलेले नेतृत्व आणि काही पक्षपात किंवा राजकारण न होता खेळाडूंची केलेली निवड याचा विचार करूनच आगामी कालावधीमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्राचा विस्तार करावा लागणार आहे.
ज्याप्रकारे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतातील विविध राज्यातील छोट्या छोट्या शहरांमधून किंवा ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंनी विक्रमी आणि उज्वल कामगिरी केलेली दिसून येते, ते पाहता कॅच देम यंग या योजनेचा पुन्हा एकदा पाठपुरावा करून देशाच्या कानाकोपर्यात दडलेले टॅलेंट शोधून त्यांना जागतिक व्यासपीठावर संधी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील या सुवर्ण कामगिरीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असेल तर ती आगामी ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत कायम ठेवून त्या स्पर्धेतसुद्धा अशी चमकदार कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.






