खाद्यतेल महाग होण्याची शक्यता

नवी दिल्ली – देशात खाद्य तेलाचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर आयातही वाढली आहे. अशा परिस्थितीत खाद्य तेलाचे दर कमी पातळीवर आहेत. त्यामुळे तेलबिया उत्पादन करणार्या शेतकर्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार सहा महिन्यात पुन्हा खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्याची शक्यता आहे. तसेच झाले तर देशातील खाद्य तेलाचे दर काही प्रमाणात वाढू शकतात.
देशात खाद्य तेलाचे बर्यापैकी उत्पादन झाले असतानाच पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. या विरोधात देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांकडून असमाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करीत आहे असे समजले जाते.
एकूण महागाईवर परिणाम शक्य
सध्या भारताच्या घाऊक आणि रिटेल महागाईत अन्नधान्याच्या महागाईचे प्रमाण जास्त आहे. खाद्यतलावरील आयात शुल्क वाढविल्यास खाद्यतेल महाग होईल आणि त्याचा एकूण महागाईच्या आकडेवारीवर परिणाम होऊ शकतो. या सर्व बाबी विचारात घेऊन या संदर्भातील आंतर मंत्रालय समिती निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत पातळीवर माहिती वृत्त संस्थांना उपलब्ध होऊ शकली नाही.
खाद्य तेलाचे दर कमी
सध्या सरकारने सोयाबीन साठी जी आधारभूत किंमत जाहीर केली आहे, त्या किमतीपेक्षाही सोयाबीन तेलाचा दर दहा टक्क्यांनी कमी आहे. या अगोदर सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने कच्या आणि तयार खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवून 27.5% इतके केले होते. मात्र तरीही खाद्यतेलाच्या किमती पुरेशा वाढलेल्या नाहीत.





