ED Arrest Ashok Pal : ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई; बनावट बँक हमी प्रकरणी सीएफओला अटक

नवी दिल्ली : उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ६८ कोटी रुपयांच्या कथित बँक हमी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात रिलायन्स पॉवर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अशोक कुमार पाल यांना ईडीने अटक केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 13 टक्के तेजी पाहायला मिळाली होती. नेमक्या त्याच दिवशी रात्री उशिरा रिलायन्स पॉवरवर ईडीने कारवाई केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ईडीने अशोक पाल यांना दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयातून चौकशीनंतर अटक केली. यानंतर अशोक पाल यांना दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनाविण्यात आली आहे. अशोक पाल यांच्यावर 68.2 कोटी रुपयांच्या संश्यास्पद बँक तारण घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपानुसार अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून रिलायन्स समुहातील आर्थिक अनियमिततांबाबत चौकशी केली जात आहे.
अशोक पाल यांची अटक 2024 मधील एका एफआयआरच्या आधारे करण्यात आली आहे. ज्यामध्ये सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला बनावट तारण देण्यात आले होते. बनावट बँक गॅरंटी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेड आणि महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेडच्या नावाने जारी करण्यात आली होती. या संबंधात ईडीने अशोक पाल यांना अटक केली आहे. ते रिलायन्स पॉवरमध्ये कार्यकारी संचालक म्हणून देखील कार्यरत आहेत. कंपनीत ते गेल्या 7 वर्षांपासून जोडले गेले आहेत. अनिल अंबानी यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक असल्याचे बोलले जात आहे.





