अनिल देशमुखांना ईडीचे पुन्हा समन्स; उद्या चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना, अटक होण्याची शक्यता

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे. अनिल देशमुख यांना उद्या म्हणजेच बुधवारी कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीने आणखी एक समन्स बजावले आहे. ईडीकडून होणारी अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्याविरोधात ईडी आता कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यापासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, देशमुख त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या चौकशीच्या संदर्भात अटकेला सामोरे जाऊ शकतात. ईडीसमोर जाणं टाळणाऱ्या देशमुख यांना आता चौकशीला हजर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे देशमुख यांना ईडी अटक करणार का? की शेवटचा प्रयत्न म्हणून देशमुख अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





