मुंबई – समन्स बजावूनही ईडीच्या समोर उपस्थित न झाल्याबद्दल ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी विशेष न्यायालयात ईडीने देशमुखांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
आयपीसीच्या कलम 174 अन्वये ही तक्रार दाखल करण्यात आली असून या कलमा अंतर्गत एक महिन्याच्या साध्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर आत्तापर्यंत अनेक वेळा समन्स जारी केली आहेत. पण ती समन्स देशमुख यांनी जुमानली नाहीत व ते ईडीच्या पुढे हजर राहिले नाहीत अशी ईडीची तक्रार आहे.
मनि लॉंड्रिंगच्या प्रकरणात देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात देशमुखांचे दोन सहकारी, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने या आधीच अटक केली असून ते सध्या तुरूंगात आहेत. या दोघांच्या विरोधात ईडीने आरोपपत्रही दाखल केले आहे. तथापि या आरोपपत्रात अनिल देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाचेही नाव नाही.