अनिल अंबानींशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे; 50 कंपन्या आणि 35 पेक्षा जास्त ठिकाणांवर धडक

नवी दिल्ली/ मुंबई – उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने आज छापे टाकले. गुरूवारी सकाळपासून ही छाप्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय तपास संस्थेने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ५० कंपन्या आणि ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. येस बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला आहे.
एकेकाळी देशातील सर्वोच्च श्रीमंतांमध्ये गणना केली जाणाऱ्या अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत किंवा विकल्या गेल्या आहेत. अलीकडेच, एसबीआयने त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि त्यांना (अनिल अंबानी) फसवे अर्थात फ्रॉड म्हणून घोषित केले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणते सीबीआयने नोंदवलेल्या दोन एफआयआरनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. याशिवाय, सेबी, नॅशनल हाऊसिंग बँक, बँक ऑफ बडोदा आणि नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) सारख्या एजन्सींनीही या प्रकरणाशी संबंधित माहिती ईडीला दिली.
ईडीच्या म्हणण्यानुसार सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की येस बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान सुमारे ३,००० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. असा आरोप आहे की ही कर्जे शेल कंपन्या आणि ग्रुपच्या इतर कंपन्यांना देण्यात आली होती आणि नंतर तेथून वळवण्यात आली होती. येस बँकेच्या अधिकाऱ्यांना, ज्यामध्ये बँकेच्या प्रवर्तकांचाही समावेश आहे, लाच दिल्याचे पुरावे तपासकर्त्यांना मिळाले आहेत.
येस बँकेच्या कर्ज वितरण प्रक्रियेत एजन्सीला अनेक गंभीर अनियमितता आढळल्या आहेत. कर्जाची कागदपत्रे नंतरच्या तारखेला तयार करण्यात आली होती, त्यांची योग्यरित्या चौकशी करण्यात आली नव्हती आणि ज्या कंपन्यांचे संचालकही सारखेच होते त्यांना कर्ज देण्यात आले होते. कर्जाच्या अटींचे उल्लंघन, खाती निरंतर चालू ठेवणे आणि कर्ज मंजुरीच्या आधी किंवा त्याच दिवशी पैसे वाटप करणे अशी प्रकरणे देखील ईडीला आढळली आहेत.




