मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि आमदारांच्या पाठीमागे लागलेला सक्तवसुली संचालनालय अर्था ईडीचा ससेमिरा अजूनही कायम आहे. आता राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली भोसले यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 27 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती. यानंतर गुरुवारी अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली भोसले यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, ईडीच्या नोटीशीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले.
2019 मध्ये इन्कम टॅक्स विभागाकडून अविनाश भोसले यांच्या पुणे व मुंबईतील ठिकाणांवर सुद्धा छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वप्नाली भोसले यांच्या चौकशीसाठी ईडीने समन्स बजावला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटीस बजावली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सुद्धा ईडीने नोटीस बजावली होती.
वर्षा राऊत यांनी ईडीच्या चौकशीला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर वर्षा राऊत यांनी चौकशीला हजर राहून सहकार्य केले होते. त्यानंतर आता विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजाविल्याने कॉंग्रेसचे नेते रडारवर असल्याचे बोलले जात आहे.