प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर सरनाईक पिता-पुत्र ईडी कार्यालयात हजर झाले.
प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांची कसून चौकशी करण्यात आली. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या.
ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते.
दरम्यान, टॉप्स ग्रुप प्रकरणात ईडीने सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमित चांदोळे यांची 12 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी दिली, ती ईडी कोठडीत बदलण्यासाठी ईडीने कोर्टात धाव घेतली आहे.





