ईडी अॅक्शन मोडमध्ये..! आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीची धाड

मुंबई – ठाकरे गटाने नुकताच गद्दार दिन साजरा केला, यानंतर आता ईडीने मुंबईत मोठे ऑपरेशन राबविले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक छापे टाकण्यात आले आहेत. कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी सुरु झाल्याचे समजते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,’ कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने १५ ठिकाणी धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये IAS अधिकारी संजीव जयस्वाल आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या नावाचाही सामावेश आहे. ईडीच्या धाडीमुळे खळबळ उडाली आहे’ आज सकाळी सुरुवातीला संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. पाटकर यांच्याशी संबंधीत १० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीयांवरही छापेमारी सुरु आहे.
कोविड कालावधीत घोटाळ्याबाबत केलेली कारवाई
कोविड काळात, सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनी सेवेशी संबंधित घोटाळ्याची चौकशी यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती. आता ईडीने कारवाई केली आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा देण्याच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करून सुजित पाटकर यांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर आज सकाळी आठच्या सुमारास ईडीचे सहा-सात अधिकारी सुजित पाटकर यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले आणि छापेमारीला सुरुवात झाली.
मुंबईत कोरोनाच्या काळात अनेक कोविड केंद्रे सुरू करण्यात आली. सुजित पाटकर यांनी एका रात्रीत कंपनी स्थापन केल्याचा आरोप आहे. नियमांच्या विरोधात जाऊन बीएमसीने त्याला कंत्राट दिले. त्यांना या कामाचा अनुभव नसताना. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे बिझनेस पार्टनर असल्याने हे कंत्राट दिले गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.





