ED : ईडीचा अंबी व्हॅलीला दणका! सहाराच्या 1460 कोटींच्या 707 एकर जमिनीवर जप्ती

नवी दिल्ली : कोलकाताच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सहारा इंडिया आणि तिच्या सहयोगी कंपन्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. कारवाई अंतर्गत ईडीने लोणावळा येथील अंबी व्हॅली सिटीभोवतीची ७०७ एकर जमीनीवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली आहे. या जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत सुमारे १४६० कोटी रुपये आहे. ही जप्ती मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत करण्यात आली आहे.
ही जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. यासाठी सहारा ग्रुपच्या कंपन्यांकडून पैसे काढण्यात आले. ओडिशा, बिहार आणि राजस्थान पोलिसांनी नोंदवलेल्या ३ एफआयआरच्या आधारे ईडीने ही चौकशी सुरू केली. हे गुन्हे मेसर्स हुमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एचआयसीसीएसएल) आणि इतरांविरुद्ध आयपीसी, १८६० च्या कलम ४२० आणि १२० ब अंतर्गत दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर, सहारा ग्रुपच्या कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरुद्ध ५०० हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले. यापैकी ३०० हून अधिक प्रकरणे पीएमएलए, २००२ अंतर्गत नोंदवण्यात आली आहेत. ज्यामध्ये मुख्यत्वे, गुंतवणूकदारांना फसवून पैसे जमा केल्याचा आरोप आहे. आरोपांनुसार गुंतवणुकदारांच्या संमतीशिवाय पैसे पुन्हा जमा करण्यात आले आणि मुदत संपल्यानंतरही पैसे दिले गेले नाहीत.
पोंझी योजना चालवली गेली
ईडीच्या तपासात सहारा ग्रुप अनेक प्रकारच्या पोंझी योजना चालवत असल्याचे समोर आले. या पोंझी योजना अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत चालवल्या जात होत्या. यामध्ये एचआयसीसीएसएल, सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एससीसीएसएल), सहारयन युनिव्हर्सल मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी (एसयूएमसीएस), स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एसएमसीएसएल) इत्यादींचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुक वाढविण्याला पोंझी योजना असे म्हटले जाते.
‘सहारा’कडून गुंतवणुकदारांची फसवणुक
सहारा ग्रुपने गुंतवणूकदार आणि एजंटना जास्त परतावा आणि कमिशनचे आमिष दाखवून फसवले. त्याने जमा केलेले पैसे कोणत्याही नियमांशिवाय वापरले. गुंतवणूकदारांना याची काहीच माहिती नव्हती. पोंझी योजना चालवण्यासाठी, सहारा समूहाने विद्यमान परिपक्वता रक्कम भरण्यास सक्षम नसतानाही नवीन ठेवी स्वीकारणे सुरू ठेवले.
जमा केलेल्या पैशाचा काही भाग बेनामी मालमत्ता निर्माण करण्यासाठी, वैयक्तिक खर्चासाठी आणि विलासी जीवनशैलीसाठी काढण्यात आला. सहारा समूहाने त्यांच्या मालमत्ता विकल्या आणि जमीन विकण्याच्या बदल्यात रोख रकमेचे पैसेही मिळाले, असेही तपासात उघड झाले. अशाप्रकारे त्यांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले.





